नागपूर : मालदा टाऊन सूरत एक्सप्रेस या स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले अन् काही डब्यात अचानक आग लागली. त्यामुळे एकच हल्लकल्लोळ उडाला. आगीत होरपळलेल्या प्रवाशांना वाचविण्यासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि नागरि सुरक्षा दलाचे जवान तसेच पोलीस धावले. आगीवर नियंत्रण मिळवून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यांना वैद्यकीय तसेच तातडीची आर्थिक (सानुग्रह) मदतही देण्यात आली.
गुरुवारी दुपारी 'हा प्रकार' अजनीच्या रेल्वे यार्डात झाला. मोठी धावपळ आणि आरडओरड ऐकून परिसरातील नागरिकही तिकडे धावले. नंतर त्यांना 'ती मॉक ड्रील होती', हे कळाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. रेल्वेत सध्या आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. अशी दुर्घटना घडल्यास तुमच्याकडे काय साधन सुविधा आहेत आणि तुमचे बचाव पथकातील मणूष्यबळ किती तत्पर आहे, त्याची चाचपणी करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने सर्वत्र दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर, येथील अजनी यार्डात गुरुवारी ही मॉक ड्रील घेण्यात आली. त्यानुसार, गुरुवारी सकाळी स्पेशल ट्रेन नंबर ०२८५३ मालदा टाऊन - सूरत एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. यामुळे झालेल्या घर्षणाने रेल्वे डब्यात आग लागली. त्यानंतर रेल्वेचे बचाव पथक, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) आणि नागरी सुरक्षा दल तसेच अग्निशमन दलासह पोलिसांनीही तिकडे धाव घेतली. रेल्वेचे बहुतांश वरिष्ठ अधिकारीही पोहचले. अपघातग्रस्त ट्रेनमधून प्रवाशांना वाचविण्यासाठी बचाव पथकाने युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू केले. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवून डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत १ मृत तर पाच जण गंभीर जखमी झाले आणि ४ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे दाखविण्यात आले.आणिबाणी अन् विशेष मदतया कथित घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला काल्पनिक आणीबाणी घोषित करण्यात आले. अपघातग्रस्त रेल्वे गाडीतील जखमी प्रवाशांना तत्परतेने सानुग्रह आर्थिक मदत देण्यात आली तसेच सर्व प्रवाशांना पाहिजे त्या ठिकाणी पोहचण्यासाठी विशेष रेल्वे पास जारी करण्यात आले. या कथित दुर्घटनेची आणि त्यानंतरच्या बचाव कार्याची रुपरेषा विभागीय सुरक्षा अधिकारी विजयकुमार पांडे यांनी तयार केली होती.