बेरोजगारांची थट्टा, काय दिवे लावले?; पकोडे तळत विरोधकांचे विधानभवन परिसरात आंदोलन

By मंगेश व्यवहारे | Published: December 15, 2023 12:23 PM2023-12-15T12:23:34+5:302023-12-15T12:23:50+5:30

‘पेपरफुटी झाली, काय दिवे लावले’, ‘भरतीची घोषणा, काय दिवे लावले’, ‘बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले,’ ‘पीएचडीधारकांची थट्टा, काय दिवे लावले’

Mockery of the unemployed, what lights on?; Protesters frying pakodas in Vidhan Bhavan area by MLA's | बेरोजगारांची थट्टा, काय दिवे लावले?; पकोडे तळत विरोधकांचे विधानभवन परिसरात आंदोलन

बेरोजगारांची थट्टा, काय दिवे लावले?; पकोडे तळत विरोधकांचे विधानभवन परिसरात आंदोलन

नागपूर : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा निषेध करत विधानभवन परिसरात पकोडे तळले. यावेळी सत्ताधाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

‘पेपरफुटी झाली, काय दिवे लावले’, ‘भरतीची घोषणा, काय दिवे लावले’, ‘बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले,’ ‘पीएचडीधारकांची थट्टा, काय दिवे लावले’, अशा घोषणा देत विरोधकांनी शुक्रवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएचडी करून काय दिवे लावणार’ असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यांचे वाक्य बरेच ट्रोल झाले. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच माझ्या बाजूने हा विषय संपल्याचे जाहीर केले आहे. मात्र, विरोधकांनी त्यांच्या ‘काय दिवे लावले’ या वाक्याला धरून शुक्रवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केले. यावेळी आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रवींद्र धंगेकर, सचिन अहिर, सतेज पाटील, रोहित पवार, के. सी. पाडवी आदींचा सहभाग होता. 

बेरोजगारीवर सरकार गंभीर नाही
सर्वच परीक्षांमध्ये पेपरफुटी वाढली आहे. सरकार यावर कुठलीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. मोदींची गॅरंटी म्हणून सरकारचे मंत्री सांगताहेत तशी गॅरंटी बेरोजगारी हटविण्यासाठी देणार का, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. सरकार बेरोजगारीच्या मुद्द्यावर गंभीर नाही. रोजगार देण्याऐवजी पकोडे तळण्याचा सल्ला सरकार देत आहे. त्यामुळे पकोडे तळून सरकारचा निषेध करण्यात आला आहे, असे दानवे यांनी सांगितले. 

Web Title: Mockery of the unemployed, what lights on?; Protesters frying pakodas in Vidhan Bhavan area by MLA's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.