नागपूर : जमिनीचा छोटा हिस्सा असणारे भारतातील ६५ टक्के शेतकरी यांत्रिकी शेतीच्या मोहात कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात. आधुनिक विज्ञानाच्या अतिवापराचे दुष्परिणाम जगासमोर येत असून शेती आणि पशुसंवर्धनाच्या शाश्वत विकासाकरिता आधुनिक विज्ञानाला पारंपरिक ज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.
राष्ट्रीय पशुवैद्यक विज्ञान संस्था आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या सोळावा दीक्षांत सोहळा व वैज्ञानिक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मत्स्य व पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला, राष्ट्रीय पशुवैद्यक विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश राव, माफसूचे कुलगुरू कर्नल डॉ. आशीष पातुरकर, कामधेनू पशुवैद्यक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दक्षिणकर, केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे माजी सचिव डॉ. तरुण श्रीधर प्रमुख अतिथी होते. डॉ. भागवत म्हणाले, शेती आणि पशुपालनावर आधारित संशोधन इंग्रजीत असल्याने ते शेतकऱ्यांना समजण्यास कठीण जाते. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रादेशिक भाषेला महत्त्व देण्यात आल्याने यापुढे शेतकऱ्यांना प्रादेशिक भाषेत हे साहित्य उपलब्ध झाल्यास त्यांना त्याचा लाभ होईल. कृषी आणि पशुपालनाच्या भरवशावर भारताच्या राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये वाढ करता येईल. परंतु त्यासाठी भारत केंद्रित दृष्टिकोन असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पशुविज्ञान अधिष्ठाता डॉ. शिरीश उपाध्ये, डाॅ. नितीन कुरकुरे, डाॅ. अनिल भिकाने, डॉ. आ. पा. सोमकुवर प्रामुख्याने उपस्थित होते.
देशाच्या राजकारणाची दिशा आरएसएस ठरवते - केंद्रीय मंत्री रूपाला
देशाच्या राजकारणाची दिशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवत असते, या दिशेच्या आधारावर भारत जगालाही दिशा दाखवू शकतो, असा दावा केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी यावेळी केला.
भागवत-रूपाला केदार यांना मानद फेलोशीप
यावेळी डॉ. मोहन भागवत, पुरुषोत्तम रूपाला, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, डॉ. तरुण श्रीधर, डॉ. उन्मेश चंद्र शर्मा यांच्यासह २० ज्येष्ठ पशुवैद्यकांना मानद फेलोशीपने सन्मानित करण्यात आले. केदार यांच्या अनुपस्थितीत कुलगुरू डॉ. पातुरकर यांनी फेलोशीप स्वीकारली. तसेच डॉ. के. के. सरमा, डॉ. अयप्पा आयपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.