सिकलसेल, थॅलेसेमिया रुग्णांना मिळणार आधुनिक उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 09:15 PM2018-08-31T21:15:22+5:302018-08-31T21:17:51+5:30
सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांना नागपूरमध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. त्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)ने हैदराबाद येथील सेंटर फॉर सायन्टिफिक अॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च अॅन्ड सेंटर फॉर सेल्युलर अॅन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी (सीएसआयआर-सीसीएमबी)सोबत सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत मेडिकलमध्ये सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांवर अत्याधुनिक उपचार करण्यासाठी आवश्यक व्यवस्था उभी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांना नागपूरमध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. त्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)ने हैदराबाद येथील सेंटर फॉर सायन्टिफिक अॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च अॅन्ड सेंटर फॉर सेल्युलर अॅन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी (सीएसआयआर-सीसीएमबी)सोबत सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत मेडिकलमध्ये सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांवर अत्याधुनिक उपचार करण्यासाठी आवश्यक व्यवस्था उभी केली जाणार आहे.
राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली आहे. मेडिकल व सेंटरच्या प्राधिकाऱ्यांनी ३० जुलै २०१८ रोजी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सेंटरने मेडिकलमध्ये व्यवस्था उभी केल्यानंतर सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांची अनुवांशिक तपासणी, रोग वाहक विषाणूंचा शोध, रुग्णांचे समुपदेशन, संशोधन इत्यादी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील. उच्च न्यायालयाने ही माहिती रेकॉर्डवर घेऊन यासंदर्भातील व्यवस्था तातडीने उभी करण्याचा आदेश सरकारला दिला आहे. नागपूरमध्ये सिकलसेल रुग्णांना आवश्यक उपचार मिळावे व विविध वैद्यकीय तपासणीसाठी आधुनिक उपकरणे उपलब्ध व्हावीत याकरिता न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात अॅड. कुलदीप महल्ले न्यायालय मित्र आहेत.
कोण आहे सीएसआयआर?
‘सीएसआयआर-सीसीएमबी’ ही आधुनिक जीवशास्त्र क्षेत्रातील आघाडीची संघटना आहे. उच्च दर्जाचे मूलभूत संशोधन करणे, प्रशिक्षण देणे आणि नवीन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार करणे हे संघटनेचे उद्देश आहेत. तसेच, सामाजिक उपयोगाचे संशोधन करणे व त्या संशोधनाचा लाभ समाजापर्यंत पोहोचविणे यासाठी संघटना कटिबद्ध आहे.