संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करताहेत मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 08:43 PM2019-12-16T20:43:19+5:302019-12-16T20:44:56+5:30
नागरिकता सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करीत आहेत. या विधेयकाचा विरोध करणाऱ्या दिल्लीतील विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अमानुष माराहाणीचा काँग्रेस आंदोलनाद्वारे निषेध करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकता सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करीत आहेत. या विधेयकाचा विरोध करणाऱ्या दिल्लीतील विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अमानुष माराहाणीचा काँग्रेसआंदोलनाद्वारे निषेध करीत आहे. मोदी सरकारच्या दडपशाहीच्या धोरणाविरुद्ध संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिली.
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ नारे-निदर्शने करण्यात आली.
थोरात म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरातील विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष माराहाण केली. माराहाणीच्या निषेधार्थ प्रियंका गांधी इंडिया गेट येथे आंदोलन करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र्र सरकार विद्यार्थ्यांवर पोलिसांमार्फत हल्ले करीत आहे, हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध नारेबाजी केली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत, खा. बाळू धानोरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. यशोमती ठाकूर, आ. विजय वडेट्टीवार, आ. अमित झनक, आ. प्रतिभा धानोरकर, आ. प्रणिती शिंदे, आ. सुभाष धोटे, आ. राजू पारवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, माजी मंत्री अनिल अहमद, अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, अतुल लोंढे, प्रशांत धवड, उमाकांत अग्निहोत्री, अमिन पटेल, मुझफ्फर हुसेन, तनवीर अहमद विद्रोही, मुजाईत खान, रौनक चौधरी, कुणाल पाटील, लहू कानडे, अस्लम शेख, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, राजू आवळे, संजय जगताप, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी उपस्थित होते.