लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंडित जवाहरलाल नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत काँग्रेस सरकारने ७० वर्षात विकासातून देश उभा केला. आज हेच वैभव नरेंद्र मोदी विकत आहेत. रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, एलआयसी, पेट्रोलियम कंपन्या, बँका अशी जनतेची संपत्ती मोदींनी आपल्या दोन खास उद्योगपती मित्रांच्या घशात घातली आहे, अशी टीका राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी रविवारी येथे केली. गेली सात वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. ही देशाच्या दृष्टीने घातक बाब ठरली असून, उद्योग, कृषी, शिक्षण, रोजगार, महागाई, जीडीपी, आंतरराष्ट्रीय संबंध, निर्यात अशा सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरले असल्याचेही ते म्हणाले.
मोदी सरकारच्या एकूणच कारभाराचा काँग्रेसतर्फे रविवारी जाहीर निषेध करण्यात आला. यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत राऊत यांनी मोदी व भाजपवर निशाणा साधला. राऊत म्हणाले, १०० दिवसात महागाई कमी करू म्हणणाऱ्यांनी महागाई तर कमी केलीच नाही; पण पेट्रोल १०० लिटर, डिझेल ९० रुपये लिटर व एलपीजी गॅस ९०० रुपये केले. खाद्यतेल १८० ते २०० रुपये लिटर केले. गरीब, सर्वसामान्य, नोकरदार तसेच मध्यमवर्गांचेही जगणे अवघड करून टाकले. काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांनाच उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले. नोटाबंदीसारखा अविचारी निर्णय घेऊन देशाला रांगेत उभे केले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले. मनमानी व लहरी पद्धतीने कसलेही नियोजन न करता देश लॉकडाऊन करून टाकला. मोदी सरकारच्या कारभाराला देशातील जनता आता विटलेली आहे.
यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, ग्रामीणचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनीही मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध केला. पत्रपरिषदेत आमदार राजू पारवे, आमदार अभिजित वंजारी, नाना गावंडे, सुरेश भोयर, अनिल नगरारे आदी उपस्थित होते.
बॉक्स
विरोधी पक्षांच्या सरकारांची अडवणूक
संविधानाला न जुमानणारे मोदी सरकार सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग, न्यायालये या सर्व स्वायत्त संस्थांमध्ये हस्तक्षेप करून लोकशाही मूल्यांची तत्त्वे पायदळी तुडवत आहेत. विरोधी पक्षांच्या सरकारची अडवणूक केली जात आहे. देशात त्यांच्याशी भेदभाव केला जात आहे, असेही राऊत म्हणाले.