नागपुरात भाजपा कार्यालयासमोर जाळला मोदींचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:03 PM2018-05-16T23:03:03+5:302018-05-16T23:03:18+5:30
कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कर्नाटकात राजकीय घडामोडीला वेग आला असता काँग्रेस जनता दल धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन झाली व सत्ता स्थापनेसाठी असलेले पुरेसे संख्याबळ प्राप्त करून सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांना सादर केला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे, असा आरोप करीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कर्नाटकात राजकीय घडामोडीला वेग आला असता काँग्रेस जनता दल धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन झाली व सत्ता स्थापनेसाठी असलेले पुरेसे संख्याबळ प्राप्त करून सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांना सादर केला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे, असा आरोप करीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
मध्य नागपूर विधानसभा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष स्वप्नील ढोके व पूर्व नागपूर विधानसभाचे कार्याध्यक्ष अक्षय घाटोळे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मॉडेल मिलस्थित भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयासमोर जमले. यावेळी पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजपाने गोवा,मेघालय,मणिपूर राज्यामध्ये काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर आला असतानाही त्यांना सत्ता स्थापन करण्याकरिता आमंत्रित केले नाही. तेथे भाजपाने अनैतिकतेने सरकार स्थापन केले. आता कर्नाटकात स्पष्ट बहुमत काँग्रेस व जनता दल(से.)ने सादर केल्यावरही राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करीत नाही. या उलट माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा कुठल्या संख्याबळावर करणार आहे. हे उघड आहे की राज्यपाल हे संघाचे कट्टर स्वयंसेवक आहे. गुजरातमधील मंत्रिमंडळात मंत्री होते. प्रधानमंत्र्याच्या हातचे बाहुले आहे. अशातच प्रधानमंत्री राज्यपालांवर दबाव टाकत आहे. सरळ सरळ लोकशाहीला पायदळी तुडवित आहे व संविधानाचा अपमान करून आपल्याला पाहिजे तसे निर्णय घेऊन या देशात हुकूमशाही निर्माण करीत आहे, असा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. आंदोलनात स्वप्नील ढोके, अक्षय घाटोळे, राजेंद्र ठाकरे, सौरभ शेळके, फजलूर रहेमान,राज बोकडे,विजय मिश्रा,चेतन डाफ,आकाश माल्लेवार, राहुल मोहोड, मन मेश्राम,ऋषभ गुहे,तेजस मार्गडे, अभिषेक महाकाळकर,हर्षल धुर्वे, अंकित गुमगावकर,गुड्डू बोकडे, हेमंत गोखले, निखिल वडगावकर आदींनी भाग घेतला.
तर संघ मुख्यालयासमोर उपोषण
भाजपाने कर्नाटकात सरकार स्थापन केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाची हत्या केली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासमोर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बेमुदत उपोषण करून जनजागृती करतील, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.