उमरेड : नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान उमरेड येथे ओव्हर ब्रिजचे (पुलाचे) बांधकाम युद्धस्तरावर होत आहे. सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांसाठी हा पूल अडचणीचा ठरेल, असे मत व्यक्त करीत महारेलचे व्यवस्थापक दत्ता यांच्याशी नागरिकांनी चर्चा करीत ओव्हर ब्रिजमध्ये बदल करा, अशी मागणी केली. ऑन दि स्पॉट संपूर्ण अचडणी समजून घेण्यात आल्या. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील प्रस्तावित पुलाची ओपनिंग २० मीटर आणि ३४० मीटर ॲप्रोज असे स्वरूप निर्धारित आहे. यात बदल करून अनुक्रमे ओपनिंग १५ मीटर आणि ॲप्रोच २०० मीटर करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व्हिस रोडचे रुंदीकरण सहा मीटरऐवजी साडेसात ते दहा मीटर करावी. सध्या रेल्वेस्थानकावरून वर्दळीच्या मार्गाने आवागमन करावे लागते. ब्रॉडग्रेजचे काम पूर्ण झाल्यानंतर अनेक रेल्वे या मार्गाने धावतील. गर्दीही वाढेल. व्यापारिकदृष्ट्या वाहतूक व्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू होईल. अशावेळी बायपास रोडलगतच्या रेल्वे क्रॉसिंगवर असलेल्या पुलाजवळूनच समांतर मार्ग तयार करण्यात आल्यास रेल्वे स्टेशनवर आवागमन करण्यासाठी फारच सोयीचे होईल, अशीही बाब यावेळी मांडण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी या बाबींचा विचार करून योग्य निर्णय घेणार, असा शब्द नागरिकांना दिला. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, डॉ. मुकेश मुदगल, दिलीप सोनटक्के, सतीश चौधरी, उमेश हटवार, हरिहर लांडे, दिनेश पटेल, विलास मुंडले, संजय मुंडले, जगदीश पटेल, जितेंद्र पटेल, रोहित पारवे, नीलेश पटेल, भूपेश पटेल, प्रफुल्ल पटेल, नंदकिशोर मानकर आदींची उपस्थिती होती.
रेल्वेच्या ओव्हर ब्रिजमध्ये बदल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:11 AM