कशी होेणार स्मार्ट सिटी? : सरकारी कार्यालयातच घाणीचे साम्राज्य लोकमत जागरनागपूर : नागपूर ग्लोबल होत आहे. स्मार्टही होईल! तीन वर्षांत मेट्रोही धावणार आहे. ‘क्लीन सिटी, आॅरेंज सिटी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या उपराजधानीत मात्र सध्या घाणीचे साम्राज्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला दाद देणाऱ्या सरकारी कार्यालय आणि परिसराचे वास्तव तर विदारक आहे.‘स्वच्छ नागपूर,सुंदर नागपूर’ असा संकल्प महापालिकेने केला आहे. पौर्णिमेच्या रात्री नागपूरसारखा ऊर्जा बचतीचा संकल्प देशाने घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. मात्र भाजपची सत्ता असलेल्या नागपुरात स्वच्छतेच्या नावावर केवळ ‘काळोख’ पसरलेला आहे. पंतप्रधानांनी गत १५ आॅगस्ट रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ चा संकल्प केला होता. यानंतर लहान असो वा मोठा प्रत्येकाच्या हातात झाडू आणि खराटा दिसला.‘स्वच्छ भारत मिशन’ खरंच वास्तवात साकारले का? या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने बुधवारी नागपुरातील सरकारी कार्यालय आणि परिसरांची प्रत्यक्ष पाहणी केली. यात विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महापालिका, जिल्हा परिषद, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मेयो, मेडिकल येथील स्वच्छतेची पाहणी केली असता मोदींचे मिशन क्लीन नागपुरात फेल, अशी स्थिती सर्वत्र दिसून आली. सरकारी कार्यालय आणि परिसरात होणाऱ्या घाणीला जबाबदार कोण? यावर चिंतन करण्यापेक्षा स्वच्छतेचा मंत्र वर्षभरात किती लोकांनी आत्मसात केला, हाच चिंतनाचा विषय आहे.पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये आम्हीही सहभागी आहोत हे दाखविण्यासाठी आबूपासून-बाबूपर्यंत प्रत्येकांनी हातात झाडू आणि खराटा घेतला. तसे फोटोही काढण्यात आले. सोशल मीडियावर मिशन क्लीन जोरात चालले. ते मोबाईलवरच राहिले. मात्र वर्षभरानंतर वास्तव निराळेच आहे. यंदा १५ आॅगस्टला तुम्ही पुन्हा हातात ‘झाडू आणि खराटा’ घ्याल, मात्र यात सातत्य राहील का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला केल्यासच नागपूर स्वच्छ आणि सुंदर होईल. ( विशेष पान २ वर)
मोदींचे मिशन क्लीन नागपुरात फेल!
By admin | Published: August 13, 2015 3:28 AM