लोकमत न्यूज नेटवर्क
पुरूलिया (प.बंगाल) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ‘खेला होबे’ या विधानसभा निवडणुकीच्या बहुचर्चित घोषणेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या पुरुलिया येथील राज्यातील पहिल्या प्रचार सभेत ‘विकास होबे’, असे उत्तर दिले.
दीदी म्हणते ‘खेला होबे’, भाजप म्हणते ‘चाकरी होबे’, दीदी म्हणते ‘खेला होबे’, भाजप म्हणते ‘विकास होबे’, दीदी म्हणते ‘खेला होबे’, भाजप म्हणते ‘शिक्षा होबे, खेला शेष होबे, विकास आरंभ होबे’, अशा शब्दात पंतप्रधानांनी तृणमूलच्या प्रचार घोषणेवर सडकून टीका केली. लोकसभा निवडणुकीत तृणमूल हाफ झाली, आता साफ होईल, अशीही तोफ डागली.
आठ टप्प्यात होणाऱ्या प.बंगाल विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचार सभा नक्षलग्रस्त पुरुलियात मोदींनी गुरुवारी सकाळी घेतली तर, दुपारी लगतच्या आसाममध्ये करीमगंज येथे सभेला संबोधित केले.
चौकट...
टीएमसी म्हणजे ‘ट्रान्सफर माय कमिशन’
केंद्रातील भाजप सरकार डीबीटी म्हणजे गरजूंना थेट मदत करणारी डायरेक्ट ट्रान्सफर बेनेफिट योजना राबविते, तर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस मात्र लोकांना लुटण्याचे काम करते, हे स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नाव टीएमसी अर्थात ‘ट्रान्सफर माय कमिशन’ असल्याची घणाघाती टीका केली.
चौकट...
शिशिर अधिकारी अमित शहांना भेटणार
भाजपवासी झालेले ममता बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी शुभेन्दु अधिकारी यांचे वडील व तृणमूलच्या संस्थापकांपैकी एक, कांथी मतदारसंघाचे २००९ पासूनचे खासदार शिशिर कुमार अधिकारी हेदेखील भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या २१ मार्चला ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊ शकतील, असे शुभेन्दु अधिकारी यांनी नंदीग्राम येथे रोड शोदरम्यान सांगितले. २० तारखेला नरेंद्र मोदी यांची नंदीग्राममध्ये प्रचार सभा होणार आहेत. त्यावेळीही ते व्यासपीठावर हजर राहू शकतील.