लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - उपराजधानीतील पहिले तारांकित हॉटेल म्हणून ओळख असलेल्या तुली इम्पेरिअलमध्ये गुरुवारी सकाळी संचालकांचा राडा झाला. हॉटेलचे मालक (भागीदार) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहब्बत सिंग तुली आणि त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करून गोंधळ घातला. कायदेशीर बाबी सांभाळणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून कागदपत्रे हिसकावून नेल्याची तक्रार हॉटेल व्यवस्थापनातर्फे गुरुवारी रात्री सीताबर्डी पोलीस ठाण्यात देण्यात आली. या घडामोडीमुळे संबंधित वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
शहरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि हॉटेल तसेच वाहतूक व्यवसायात मोठा जम असलेल्या मोहब्बतसिंग तुली यांच्या परिवारात त्यांच्यासह पाच भाऊ आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून त्यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू आहेत. ते टोकाला गेल्याने अनेकदा पोलीस तक्रारी झाल्या असून प्रकरण न्यायालयातही गेले आहे. अशाच एका वादावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीने ऑर्बिट्रेटरही नेमण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऑर्बिट्रेटरसोबत वाद निकाली काढण्यासाठी त्यांचे बैठकसत्र सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली होती, असे समजते. या पार्श्वभूमीवर, आज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास तुली इम्पेरिअलमध्ये मोहब्बतसिंग तुली आणि त्यांचे दोन साथीदार आले. एका रूममध्ये ऑर्बिट्रेटरचे सहायक कागदपत्रांची पाहणी करत असताना तुली आणि साथीदारांनी तेथून काही कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली. विरोध केला असता त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर भागीदारही तेथे पोहोचले. त्यानंतर वाद अधिकच चिघळला. माहिती कळल्यानंतर सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी दोन्ही गटांना शांत करून काय समस्या आहे, ती शांतपणे सोडवा अन्यथा पोलिसांकडे तक्रार द्या, असे सांगितले. पोलिसांच्या उपस्थितीमुळे काही वेळ वाद शमला. मात्र, पोलीस निघून गेल्यानंतर तो दिवसभर धुमसतच राहिला. रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास हॉटेल व्यवस्थापनातर्फे आकाश शर्मा यांनी पोलीस ठाण्यात येऊन मोहब्बतसिंग तुली आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये येऊन शिवीगाळ केली. मारहाण करून धमकी दिली आणि मालमत्तेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याचे या तक्रारीत नमूद असल्याचे समजते.
---
पोलिसांचे मंथन
प्रकरण हायप्रोफाईल आणि आपसी वादाचे असल्याने यात कोणती कारवाई करावी, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. त्यामुळे वरिष्ठांचे यासंबंधाने रात्री मंथन सुरू झाले. दोन्ही बाजू तपासल्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरविण्यात येईल, असे ठाणेदार सबनीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
----