नागपूर : जंगलामधील मोहाफूल वेचण्याचा आणि तेंदुपत्ता तोडाईचा हंगाम लवकरच सुरू होत आहे. मोहाफुलांच्या वेचणीसाठी आदिवासी गावांमधील नागरिकांचा जंगलामधील वावर आता वाढायला लागला आहे. तेंदुपत्ता हंगामाला जवळपास एक महिना बाकी असला तरी, मोहाफूल संकलनामुळे वन्यजीव संघर्षाचा धोका वाढला आहे. हे लक्षात घेता, वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे.
मागील चार वर्षात जंगलामधील वाघ, बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पूर्वीसारखे बिनधास्तपणे जंगलात जाणे आता धोकादायक ठरायला लागले आहे. पूर्वी वनउपजाच्या संकलनासाठी जंगलात जाणे हा आनंददायी अनुभव असायचा. मात्र आता वन्यजीवांमुळे धोके वाढले आहेत. अनेक जंगले संरक्षित झाल्याने प्रवेशावरही प्रतिबंध आला आहे. यामुळे हक्काचे वनउपज मिळवताना आदिवासी बांधवांपुढे अडचणी वाढल्या आहेत. मोहाफूल वेचण्याच्या हंगामात वन्यजीव संघर्ष हा नेहमीचाच असतो. जंगलावर उपजीविका असणाऱ्या गावांसाठी हे हंगाम महत्त्वाचे असतात. या दिवसातील हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मोहाफूल संकलनासाठी आणि तेंदुपत्ता तोडाईला जाताना मिळून जा, अशा सूचना आतापासूनच गावकऱ्यांना दिल्या जात आहेत.
नागपूर वन विभागांतर्गत एकूण १४ वनपरिक्षेत्र येतात. हे वनक्षेत्र सुमारे १ लाख ४६ हजार हेक्टरचे आहे. या वनक्षेत्राची सीमा पेंच व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, बोर अभयारण्य, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. त्यामुळे सेमिनरी हिल्स, नागपूर वनपरिक्षेत्र वगळता इतर १३ वनपरिक्षेत्रे वन्यजीवांचे कॉरिडोर आहेत.
नागपूर जिल्ह्यातील ५५० गावे ही वनालगत आहेत. सुमारे २० ते २२ हजार कुटुंबांची उपजीविका वनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात वनक्षेत्रात मोहफुले किंवा तेंदुपत्ता संकलनासाठी जातात. सकाळी जंगलामध्ये वन्यप्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात फिरत असतात. त्यामुळे वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावकऱ्यांना सकाळी लवकर जंगलामध्ये न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जंगलामध्ये जाताना कमीत कमी १० व्यक्तींनी एकत्र जावे. तेंदुपाने तोडताना तसेच मोहाफुले वेचताना बराच वेळ वाकून राहू नये. दोन-तीन व्यक्तींनी एकत्र येऊन काम करावे, एकमेकांशी सारखे बोलत राहावे, काम करताना वाकल्यास वन्यप्राण्यांना तो प्राणी वाटतो व ते हल्ला करू शकतात, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात येत आहेत. वनात डोक्यामागे मुखवटा घालून चालावे, खांद्यावर जमिनीस समांतर काठी घेऊन चालावे, असे उपायही यापूर्वी सुचविण्यात आले होते.
कोट
गावकऱ्यांशी संपर्क साधून वन विभागाच्या यंत्रणेद्वारे मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना सांगितल्या जातील. या गावकऱ्यांच्या जागृतीसाठी ग्रामपंचायती आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच क्षेत्रीय कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
- डॉ. प्रभुनाथ शुक्ल, उपवन संरक्षक, नागपूर वन विभाग