नागपूर: एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी आचरण महत्त्वाचे असते. हिंदू संस्कृती आणि हिंदुत्वही आचरणावर जास्त भर देतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी अनेक प्रकारच्या टीका केल्या आहेत. हिंदूराष्ट्रापासून ते घरवापसीपर्यंतच्या मुद्द्यांवर संघावर निशाणा साधण्यात आला आहे. मात्र, टीका करणाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात यावे. कार्यपद्धती, आचरण यांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मांडले. लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी अनेकविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. धारण करणारा नियम म्हणजे धर्म होय. हिंदू हा धर्म नाही, ती सनातन काळापासून चालत आलेल्या परंपरांची आचरण पद्धती आहे, असेही भागवत यांनी म्हटले आहे.
हिंदुत्वाचा उच्चार RSS आणि सावरकरांचा नाही
हिंदुत्व या संकल्पनेचा प्रथमोच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पहिल्यांदा केला असे नाही. हिंदुत्वाचा पहिला उच्चार गुरुनानक यांनी केला. हिंदू समाज शस्त्रास्त्र घेऊन बलशाली झाला, तरी तो गोष्टी भगवद्गीतेच्या करेल, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते. याचे कारण म्हणजे हिंसेचे समर्थन हिंदू करत नाही. अहिंसा, सत्याच्या मार्गावर चालणारा हिंदू आहे. प्राचीन काळापासून आतापर्यंत हिंदुंनी केलेली युद्धे विनाश करण्यासाठी नाही, तर रक्षणासाठी केलेली दिसतात, असे सांगत हिंदुत्व संस्कृती सर्वत्र पवित्रता पाहते. हा स्वभाव समाजाचा आहे. समाजाचे तेच अधिष्ठान आहे, असे मोहन भागवत म्हणाले.
भारतभक्ती, संस्कृती, पूर्वजगौरव
भारतभक्ती, संस्कृती, पूर्वजगौरव महत्त्वाचे आहे. कारण आपल्या पूर्वजांनी राष्ट्र उभे करण्यासाठी, संस्कृती रुजवण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी, तिच्या विकासासाठी अनेक कष्ट सोसले आहेत. असे पूर्वज आपले आदर्श आहेत. त्यांना आपण आदर्श मानले पाहिजे. म्हणूनच आम्ही या तीन तत्त्वांचा आग्रह धरतो, असे मोहन भागवत म्हणाले. चुकीच्या गोष्टींचा त्याग करण्याची आवश्यकता आहे. आमचेही काही चुकत असले, तरी ते आम्ही सोडून दिले पाहिजे. एकता आहे हाच विचार समान आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले. खऱ्या हिंदूत्वाच्या आचरणातून जाती वर्चस्वासारख्या गोष्टींचे समूळ उच्चाटन केले जाऊ शकते, असा दावा भागवत यांनी यावेळी बोलताना केला.
जगातील सर्वात धर्मनिरपेक्ष आमचे संविधान
माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या भेटीची आठवण मोहन भागवत यांनी सांगितली. आजारी असतानाही फक्त मला भेटण्याची परवानगी त्यांनी दिली. तेव्हा घरवापसीचा मुद्दा गाजत होता. त्यावर काहीशा रागाच्या स्वरात ते मला म्हणाले होते की, गेल्या ३०० वर्षांपासून मिशनरी भारतात धर्मांतरण करण्याचे काम करतायत आणि काही जणांची घरवापसी केली म्हणून तुम्ही पत्रकार परिषदा कसल्या घेता. मात्र, पुढचेच वाक्य त्यांचे असे होते की, जगातील सर्वात धर्मनिरपेक्ष आमचे संविधान आहे. ५ हजार वर्षांपासूनचे आमचे संस्कार, परंपरा धर्मनिरपेक्ष आहेत. आता संविधानात नमूद केले म्हणून इतिहास बदलत नाहीत, अशी एक आठवण त्यांनी सांगितली.
दरम्यान, हिंदुत्वावर होत असलेली कठोर टीका ही समाजाच्या विकासासाठी आहे, असा त्याचा अर्थ घ्यायला हवा. नवीन जग निर्माण करण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा. कोरोनानंतर काय, या मुद्द्यावरून जग आपल्याकडे पाहत आहेत. मात्र, गेल्या हजारो वर्षांपासून चालत आलेली आचरण पद्धती आजच्या घडीला बहुतांश जगाने मान्य केली आहे. तीच हिंदू संस्कृती आहे. यालाच आता प्रोत्साहन देत त्याचा प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक आहे, असेही मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.