लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली असली तरी नागपूर जिल्ह्यात अद्याप एकाही केंद्रावर क्विंटलभरही कापूस खरेदी झालेली नाही. कापसामध्ये अद्यापही ओलावा (मॉयश्चर) असल्याने ही खरेदी लांबली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कापूस खरेदीचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे.
राज्यात सीसीआयची ९० कापूस खरेदी केंद्र असून नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल आणि सावनेर या दोन ठिकाणी ही केंद्र आहेत. या दोन्ही केंद्रांवर खरेदीसाठी सज्जता झाली असली तरी एकाही केंद्रावर खरेदी झालेली नाही. सीसीआयचे दोन केंद्र असताना पणन महासंघाकडे मात्र खरेदीचे एकही केंद्र नाही.
शासनाने यंदा जाहीर केलेल्या दरानुसार, लांब धाग्याच्या कापसाला ५,८२५ रुपये प्रतिक्वंटल दर आहे, तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी ५,५१५ रुपयांचा दर मिळणार आहे. परंतु केंद्रावर खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना सध्यातरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. साधारणत: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातपर्यंत ओलावा घटण्याची शक्यता असून त्यानंतरच कापूस खरेदी सुरू होईल, असा अंदाज आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांचा कापूस केंद्रावर पोहचतो. मात्र यंदा दरवर्षीपेक्षा अधिक प्रमाणावर पाऊस लांबला. यामुळे कापसातील ओलावा अद्यापही कायम आहे. हा ओलावा असलेला कापूस खरेदी केल्यास तो जिनिंगवर चालत नाही. किमान १० टक्के मॉयश्चर असल्याशिवाय धाग्याचा स्टेपल मिळत नाही. सध्यातरी हा मॉयश्चर ३० टक्के असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही खरेदी लांबली आहे. शेतकऱ्यांचा कापूस निघाला असून सीतादेवीची पहिली वेचणीही झाली आहे. बहुतेक शेतकऱ्यांकडे सरासरी १० क्विंटल कापूस पडून आहे.
सरकीच्या भावात घसरण
यंदा सरकीच्या भावातही घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी २६ रुपये प्रतिकिलो असलेला दर आता २२ रुपयांवर घसरला आहे. यामुळे शेतकरीही सरकीच्या दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र खरेदी सुरू झाल्यावर दर वाढण्याऐवजी घसरतात, असाच दरवर्षीचा वाईट अनुभव आहे.
खेडा खरेदीसाठी व्यापारी गावात
व्यापाऱ्यांची कापूस खरेदी मात्र सुरू झाली आहे. खेडा खरेदीसाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात पोहचले असून त्यांनी दर मात्र ५,४५५ रुपये प्रति क्विंटल ठेवला आहे. पणनच्या दरापेक्षा व्यापाऱ्यांचे दर कमी आहेत. असे असले तरी आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी व्यापाऱ्यांच्या गळाला लागत आहेत.
...