नागपूर : अमरावती मार्गावरील सुराबर्डीत आयोजित थर्टी फर्स्टच्या पार्टीत महिला आणि अल्पवयीन मुलींची छेडखानी आणि मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. रात्री एक वाजता या तोडफोडीत अनेक युवक-युवतींना दुखापत झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कडक कारवाई न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुराबर्डीच्या एका चर्चीत हॉटेल परिसरात थर्टी फर्स्टची पार्टी आयोजित करण्यात आली होती. नागरिकांना पहाटे चार वाजेपर्यंत पार्टी सुरू राहणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. निर्जन परिसर असल्यामुळे येथे युवा जोडपे मोठ्या संख्येने येतात. नाचगाणे आणि ऐशआराम करण्यासाठी इच्छुक बहुतांश युवक-युवती या पार्टीत आल्या होत्या. यात अल्पवयीनांची संख्या अधिक होती. या पार्टीत दारूसोबत मादक पदार्थांचे सेवन करण्यात येत होते, असे सांगण्यात येत आहे. यामुळे अनेक अल्पवयीनांची शुद्ध हरवली.
रात्री १२ वाजता नव्या वर्षाचा आनंद साजरा करताना असामाजिक तत्त्वांच्या समूहाने पतीसोबत डान्स करणाऱ्या महिलेची छेड काढली. महिलेच्या पतीने असामाजिक तत्त्वांना फटकारले असता एका युवकाने संतप्त होऊन बाटलीने महिलेवर हल्ला केला. हे पाहून कुटुंंबासह आलेल्या काही कुटुंबीयांनी छेडखानी आणि हल्ला केलेल्या महिला आणि तिच्या पतीची बाजू घेतली. दरम्यान, असामाजिक तत्त्व अल्पवयीन मुलींची छेडखानी करू लागले. तेथे जास्त बाऊन्सर नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
या घटनेमुळे नाराज नागरिकांनी पार्टीचे आयोजक जाफरनगर येथील दोन बंधूंचा शोध सुरू केला. नागरिकांचे नियंत्रण सुटले आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. पार्टीत लावलेले स्टेज, साऊंड सिस्टीमसह हाताला लागेल ती वस्तू तोडली. हे पाहून असामाजिक तत्त्व त्याचा फायदा घेऊन आपत्तीजनक व्यवहार करू लागले. त्यामुळे नागरिकांचा राग आणखीनच वाढला. घटनास्थळी उपस्थित काही पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बोलावले. वरिष्ठ अधिकारीही तेथे पोहोचले.
दरम्यान, पार्टीचे आयोजक बंधू फरार झाले. त्यांनी वर्षभरापूर्वी हिंगणाच्या एका फार्म हाऊसवर नियम धाब्यावर बसवून पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत कुख्यात गुन्हेगाराचा समावेश होता. गुन्हे शाखेचे तत्कालीन उपायुक्त गजानन राजमाने यांनी या पार्टीवर छापा टाकला होता. या प्रकरणात आयोजक बंधूंवर कडक कारवाई झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना खरी माहिती न देता पार्टीचे आयोजन केले होते.
पोलिसांशी मिलीभगत असल्याने कारवाई नाही
पार्टीतील काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, ज्या पद्धतीने अल्पवयीन दारू आणि मादक पदार्थांचे सेवन करीत नाचत होते, ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पार्टीत सुरक्षेची कोणतीच व्यवस्था नव्हती. पाच-दहा बाऊन्सर शो पीससारखे उभे होते. छेडखानीच्या घटना होत असून बाऊन्सरची संख्या वाढविण्याची मागणी केल्यानंतर आयोजकांनी काहीच उपाययोजना केली नाही. आयोजकांची पोलिसांशी मिलीभगत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एवढी मोठी घटना होऊनही कडक कारवाई करण्यात आली नाही.
क्रिकेट सट्टेबाजांनी आणली एमडी
सूत्रांनुसार पार्टीत क्रिकेट सट्टेबाजांचा एक मोठा गट आला होता. या ग्रुपने मोठ्या संख्येने एमडी आणली होती. या ग्रुपने अनेक अल्पवयीनांना एमडी उपलब्ध करून दिली. यामुळे या प्रकरणाचा बारकाईने तपास करणे गरजेचे झाले आहे.
पिपळातील ईडीएम पार्टीतही राडा
पिपळा ग्रामपंचायतमधील बॅक यार्ड लॉनमध्ये आयोजित ईडीएम पार्टीतही युवकांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. या पार्टीत युवक गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाल्यामुळे हुडकेश्वर पोलिस रात्री ९:३० वाजता पार्टीत पोहोचले. त्यांनी डीजे बंद केल्यामुळे पार्टीतील युवक संतप्त झाले. त्यानंतर काही राजकीय पक्षाची मंडळी पार्टीत पोहोचली. त्यांनी आयोजकांना पैसे परत करण्याची मागणी केली. पार्टीतील युवकांनी स्टेज आणि दारूच्या पेट्या फोडल्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. रात्री १०:३० वाजता महिला पोलिस आणि अतिरिक्त ताफा बोलाविल्यानंतर ही पार्टी पूर्णपणे बंद करण्यात आली.