लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुरावलेल्या महिला पोलीस मैत्रीणीला रस्त्यात अडवून तिच्यावर हक्क दाखवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. कोराडी पोलिसांनी त्याला विनयभंग तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. नीलेश भाऊराव थोरात (वय २७) असे त्याचे नाव आहे. तो मुळचा अमरावती जिल्ह्यातील तळेगाव (तिवसा) येथील रहिवासी आहे.नीलेशचा नातेवाईक पोलीस दलात आहे. त्यामुळे तो सध्या पोलीस लाईन टाकळी, गिट्टीखदान मध्ये राहतो. तो नागपुरात पोलीस दलात रुजू होण्यासाठी आला होता. भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात एकाच वर्गात असताना त्याची आणि तक्रार करणा-या तरुणीची ओळख झाली. नंतर मैत्री आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते, असे पोलीस सांगतात. दरम्यान, तरुणी पोलीस भरतीत यशस्वी ठरली अन् पोलीस दलात रुजू झाली. नीलेश मागे पडला. त्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधातही दुरावा निर्माण झाला. ती टाळत असल्याचे लक्षात आल्याने तो तिचा नेहमी पाठलाग करू लागला. रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ती दुचाकीने सहकारी महिला पोलिस कर्मचा-यासह कर्तव्यावर जात होती. आरोपी नीलेशने तिला कोराडीतील सुंदर बिस्कीट कंपनीसमोर अडविले. तिचा हात पकडून तिच्यासोबत जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला. नकार देऊनही तो तिच्याशी लगट करून शिवीगाळ करू लागला. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार नोंदवली. कोराडी पोलिसांनी नीलेशविरुद्ध विनयभंग तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली नीलेशला अटक केली.लकडगंजमध्ये महिलेशी लज्जास्पद वर्तनरविवारी रात्री १०.१० च्या सुमारास लकडगंजमधील ५० वर्षीय महिलेच्या घरी जाऊन आरोपी बंटी सुनील मिश्रा (वय २०, रा. गरोबा मैदान) याने भांडण केले आणि त्यांचा हात पकडून त्यांच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. महिलेच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविला.
नागपुरात महिला पोलीस मैत्रीणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:18 PM
दुरावलेल्या महिला पोलीस मैत्रीणीला रस्त्यात अडवून तिच्यावर हक्क दाखवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. कोराडी पोलिसांनी त्याला विनयभंग तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली.
ठळक मुद्देप्रेमप्रकरणाला कलाटणी : आरोपी गजाआड