आयुक्त हर्डीकर यांची खंत : जाता जाता सांगितले मनपाचे वास्तव नागपूर : स्मार्ट सिटी, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग धोरण, कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करणे, घरकूल योजनांचे काम करण्यात यश आले. सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. अडीच वर्षांचा कार्यकाळ चांगला राहिला. उपराजधानीला सुंदर व समृद्ध करण्याच्या अनेक कल्पना राबविण्याचा विचार होता. परंतु पैशाची चणचण असल्याने काही कल्पना कागदावर राहिल्या, याची खंत असल्याची प्रतिक्रिया आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली. हर्डीकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली आहे. २७ एप्रिलला ते पदभार सांभाळणार आहेत. २६ एप्रिलला नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांच्याकडे पदभार सोपविणार असल्याची माहिती हर्डीकर यांनी सोमवारी पत्रकारांशी चर्चा करताना दिली. महापालिकेचा कारभार उत्तम करण्याचा प्रयत्न केला. शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. यासाठी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पूर्ण समर्थन मिळाले. काही मुद्यांवर विरोध होता, परंतु लोकशाहीत ही प्रक्रिया अपेक्षित असते. शहरातील अवैध बांधकामाला आळा घालण्यासाठी त्यावर बुलडोझर चालविणे हाच एकमेव पर्याय नाही. अतिक्रमण होणार नाही, हाच त्यावर प्रभावी पर्याय आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. पुढील ३० वर्षांचा विचार करून शहरालगतच्या भागाचा विकास क रण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांना भविष्यात उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.२४ बाय ७ पाणीपुरवठा योजना व सिवेज प्रक्रि या केंद्राचे काम पुढील तीन वर्षांत पूर्ण होईल. या प्रकल्पांच्या देखभालीचा खर्च कमी यावा, त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहे. भांडेवाडीला कचरामुक्त करण्यासाठी बायोमायनिंगची निविदा काढण्यात आली आहे. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. शहराची लोकसंख्या २७ लाखांवर गेली आहे. सहा लाख मालमत्ताधारक आहेत. पुढील तीन वर्षांत महापालिकेच्या मालमत्ता करात वाढ होईल, असेही हार्डीकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कर सुधारणामुळे औद्योगिक विकासमध्य भारतातील इंदूर व रायपूर या शहरांचा वेगाने विकास झाला आहे. त्या तुलनेत नागपूरचा विकास झालेला नाही. याला कर आकारणी पद्धतीमधील त्रुटी कारणीभूत आहेत. आता यात सुधारणा करण्यात आली आहे. यंत्रणेत पारदर्शता आली आहे. यामुळे भविष्यात नागपूर शहराच्या औद्योगिक विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास हर्डीकर यांनी व्यक्त केला.नागनदी व २४ बाय ७ अपूर्ण असल्याची खंतनागनदी पुनरुज्जीवन व २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचा मानस होता. परंतु या योजनांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, अशी खंत हर्डीकर यांनी व्यक्त केली. या प्रकल्पामुळे शहराला नवी ओळख मिळेल. रोजगार, करमणूक स्थळ व सिवेज यावर तोडगा निघाल्यावर नागपूर देशातील सर्वश्रेष्ठ शहर होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पैशाची चणचण; कल्पना कागदावरच!
By admin | Published: April 25, 2017 1:38 AM