नरखेड/जलालखेडा (नागपूर) : शेतकऱ्याला वडिलाेपार्जित शेतीचा फेरफार करून सातबारा देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महसूल विभागातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने लाच स्वीकारताना अटक केली. ही कारवाई जलालखेडा (ता. नरखेड) येथे बुधवारी (दि. २८) सायंकाळी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या लाचखाेर आराेपींमध्ये मंडळ अधिकारी आशिष चंद्रमणी धनविजय (वय ३८, रा. वर्धमाननगर, नागपूर) व तलाठी अनिकेत रवींद्र वहाने (३२, रा. साकेतनगर, अजनी, नागपूर) या दाेघांचा समावेश आहे. थडीपवनी (ता. नरखेड) येथील ३० वर्षीय शेतकऱ्याला त्यांच्या वडिलाेपार्जित शेतीचा फेरफार करून सातबारा हवा हाेता. यासाठी त्यांनी तलाठी अनिकेत वहाने याच्याकडे रीतसर अर्ज केला हाेता. अनिकेतने त्यांना मंडळ अधिकारी आशिष धनविजयकडे पाठविले. आशिष धनविजय महेंद्री विभागाचा कारभार सांभाळताे.
या कामासाठी दाेघांनीही शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने एसीबीच्या नागपूर कार्यालयात तक्रार नाेंदविली. ठरल्याप्रमाणे एसीबीच्या पथकाने जलालखेडा येथे सापळा रचला. दाेघांनीही शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये स्वीकारताच त्यांना अटक केली.
या दाेघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पाेलिस अधीक्षक राहुल माकणीकर, उपअधीक्षक महेश चाटे, उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनात एसीबीचे पाेलिस निरीक्षक प्रवीण लाकडे, शिपाई सारंग बालपांडे, गीता चौधरी, अस्मिता मेश्राम, प्रफुल्ल बांगडे, सदानंद शिरसाट यांच्या पथकाने केली.