मेघा तिवारी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे मुलीवरील अत्याचाराच्या घटनेतून स्वत:ला सावरत तिला चांगला उपचार मिळावा म्हणून तिचे कुटुंब प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना दुसरीकडे उपचाराचे पैसे मोजण्यासह बाहेरून औषध घेण्यास पिटाळून लावण्याचा धक्कादायक प्रकार मेयोत घडला आहे. विशेष म्हणजे, अत्याचारपीडितांवर मोफत उपचार करण्याचे नियम असताना त्याची सर्रास पायमल्ली झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.घराजवळ खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला तिचे तोंड दाबून गावालगतच्या झुडपात नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडेगाव परिसरात १९ आॅक्टोबर रोजी घडली. तिला उपचारार्थ नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल केले. सलग चार दिवस ती व्हेंन्टिलेटरवर होती. ३२ वर्षीय शेजारी पुरुषाने सरबतात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. यात त्या मुलीच्या डोक्याला, चेहऱ्यावर, पोटावर, पायासह शरीराच्या अनेक भागावर गंभीर जखमा झाल्या. या घटनेचा मुलीवर मानसिक परिणाम झाला. अशा स्थितीत मेयोमध्ये दाखल असताना तिच्या नातेवाईकांकडून उपचारासाठी पैसे मागितले. आर्थिक स्थिती नसताना उपचाराचे पैसे जमा करताना कुटुंबाला मोठ्या अडचणीतून जावे लागले. ‘लोकमत’ प्रतिनिधीने रविवारी जेव्हा पीडित मुलीची भेट घेतली असता नातेवाईकांनी रुग्णालयाने एमआरआय व अल्ट्रासाऊंड पैसे भरल्यावर उपचार केले जाण्याची माहिती दिली.
रुग्णवाहिकेची सोय नाहीपीडिताच्या डोक्याला जखम असल्याने मेडिकलमध्ये जाऊन एमआरआय करण्यास डॉक्टरांनी सांगितले. मेयो प्रशासनाकडे रुग्णवाहिकेची सोय नाही. यामुळे पीडितेच्या नातेवाईकांनी स्वत:च्या खर्चाने ही सोय केली. रुग्णवाहिकेच्या चालकाने मानवतेच्या दृष्टीने कमी भाडे आकारले. मेडिकलमध्ये पोहचल्यावर तेथील परिचारिका व कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत केली. नातेवाईकांनी आरोप लावला की, गरीब असल्यामुळेच कुणी आपल्याकडे लक्ष देत नाही. शासकीय योजनेपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे. रुग्णवाहिकेत आरोपीकडून हल्ला होण्याचीही भीती होती.
प्रकरणाची माहिती घेतली जात आहेपीडित मुलीला नि:शुल्क उपचार मिळायला हवेत. या प्रकरणाची तूर्तास विशेष काही माहिती नाही, यासाठी संबंधित डॉक्टरांना माहिती घेण्यास सांगितले आहे. त्या पीडितेचे जे काही पैसे खर्च झाले ते तिला परत केले जातील.-डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो