योगेश पांडे
नागपूर : एक, दोन किंवा तीन नव्हे, तर देशातील २४ हून अधिक जणांसोबत लग्न करून त्यांची फसवणूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील ‘लुटेरी दुल्हन’च्या अटकेमुळे मोठे ‘रॅकेट’ समोर आले आहे. नागपूर व आजूबाजूच्या परिसरातदेखील लग्नासाठी आसुसलेल्या नवरदेवांना ‘मनी ट्रॅप’मध्ये अडकवीत त्यांना लुटणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. ‘सबकुछ ऑनलाइन’च्या युगात ‘व्हर्चुअल’ माध्यमातूनच नवरी शोधण्याचा प्रकार काही नवरदेवांच्या अंगलट आला आहे.
अशी असते ‘मोडस ऑपरेंडी’
साधारणत: ‘सोशल मीडिया’ किंवा ‘मॅट्रिमॉनिअल साइट्स’च्या माध्यमातून विवाहासाठी इच्छुक असलेल्या पुरुषांचा शोध घेतला जातो. अनेक प्रयत्न करूनदेखील लग्न जुळत नसलेले किंवा वय जास्त असलेल्यांना ‘टार्गेट’ करण्यात येते. त्याच्याशी वेगवेगळ्या ‘फेक अकाउंट’च्या माध्यमातून तरुणी संपर्क साधतात. त्याचा विश्वास बसला की तिचे नातेवाईक बनून तिचेच सोबती बोलणी करायला जातात. अनेकदा आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगत नवरदेवाकडून पैशांची मागणी करण्यात येते. लग्न झाल्यावर लगेच पैसे देऊ असेदेखील सांगण्यात येते. लग्न झाल्यावर काही दिवसांत मुलगी नवरदेवाची फसवणूक करून पसार होते. अनेकदा इभ्रतीचा विचार करून पोलीस तक्रार करण्याचेदेखील टाळले जाते.
लग्नासाठी अनोळखीला पैसे देऊ नका
लग्न करीत असताना जर संकेतस्थळ किंवा ‘सोशल मीडिया’चा आधार घेण्यात येत असला तर मुलगी व तिच्या तपशिलांची सखोल चाचपणी आवश्यक आहे. सोबतच तिच्या कुटुंबीयांची माहितीदेखील खरी आहे की नाही याची खात्री करून घेेतली पाहिजे. लग्न जमविण्यासाठी कुणी अनोळखी व्यक्ती पैशांची मागणी करीत असेल तर तो प्रकार टाळला पाहिजे, असे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.
तिने पाच कुटुंबीयांना केले उद्ध्वस्त
स्वत:च लग्नाची ऑफर देऊन शरीरसंबंध प्रस्थापित करायचे अन् नंतर दागिने आणि तगडी रोख रक्कम घेऊन पळ काढायचा. मागावर आलेल्या नवऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्काराची आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध छळाची तक्रार नोंदवायची अन् बदल्यात त्यांच्याकडून खंडणी उकळायची, असा अफलातून फंडा नागपुरातील एका ‘लुटेरी दुल्हन’ने वापरला होता. मूळची सक्करदरा येथील या महिलेच्या छळामुळे पाच कुटुंबीय उद्ध्वस्त झाले व पोलिसांत त्यांनी अखेर तक्रार केली. एका पीडित नवरदेवाच्या धिटाईनंतर नुकतीच ती महिला पोलिसांच्या ताब्यात आली आहे.