नोडल अधिकारी विद्वंस यांची साक्षनागपूर : नागपूर शहर गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त सावंत यांच्या विनंती पत्रावरून आपण तीन मोबाईल्सचा कॉल डिटेल्स अहवाल पाठविला होता, अशी साक्ष पुणे येथील टाटा टेलि सर्व्हिसेसचे नोडल अधिकारी मकरंद विद्वंस यांनी बहुचर्चित मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.डब्ल्यू. चांदवानी यांच्या न्यायालयात दिली. आपल्या सरतपासणीत साक्ष देताना त्यांनी सांगितले की, ग्राहकांचे येणारे कॉल, जाणारे कॉल, कॉलचा कालावधी, आयएमईआय क्रमांक आणि टॉवर लोकेशन आमच्या कंपनीच्या पुणे येथील सर्व्हरमध्ये आपोआप रेकॉर्ड होतात. या कामात कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. सर्व्हरवरील माहिती घेण्यासाठी पासवर्डची गरज असते आणि तो फक्त आपणासच माहीत असतो. या अधिकार्याने पुढे असे सांगितले की, सावंत यांच्याकडून ७ एप्रिल २०११ रोजी ७२७६६३३८१४, ८१४९९७५३०३ आणि ८९८३९३९५८० या क्रमांकांच्या मोबाईल्सचे कॉल डिटेल्स मागवण्यात आले होते. त्यानुसार आपण सर्व्हरवरून कस्टमर आयडी प्राप्त केला होता. हे मोबाईल अनुक्रमे रामभाऊ पंदर, नीलेश जयस्वाल आणि दीपक कावळे यांचे होते. आपण सर्व्हरवरून या सर्व मोबाईल्सचे कॉल डिटेल्स घेतले आणि त्याबाबतचा संपूर्ण अहवाल गुन्हेशाखेकडे पाठविला, असेही या अधिकार्याने सांगितले.
मोनिका खून खटला:तीन मोबाईल्सचे कॉल डिटेल्स गुन्हे शाखेला पाठविले होते
By admin | Published: May 06, 2014 8:19 PM