लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : एकीकडे काेराेनामुळे सर्वच बेजार झाले आहेत. दिवसेंदिवस काेराेना रुग्ण वाढत आहेत. लाॅकडाऊनमुळे हाताला काम नाही. उपचार घेण्यासाठी पैसा नाही, अशी बिकट परिस्थिती सर्वसामान्यांवर ओढवली आहे. दुसरीकडे माकडांचे कळप धुमाकूळ घालत असल्याने रामटेक शहरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या माकडांचा तात्काळ बंदाेबस्त लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील अनेक भागात सायंकाळपासूनच माकडांचे कळप मुक्काम ठाेकतात. घरामध्ये शिरणे, खाण्याच्या वस्तू घेऊन पळणे, घरासमाेरील वाहनांवर उड्या मारणे तसेच महिला व लहान मुलांच्या अंगावर धावून येणे, असा माकडांचा उपद्व्याप दिवसभर सुरू असताे. यामुळे नागरिकांमध्ये विशेषत: महिलांमध्ये भीती पसरली आहे. या माकडांचा बंदाेबस्त करण्यासाठी वनविभाग तयार नाही. वारंवार तक्रारी करूनदेखील लाेकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप नागरिकांचा आहे.
विशेष म्हणजे, माकडाने चावा घेऊन अनेकांना गंभीर जखमी केल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. असे असतानाही त्यावर उपाययाेजना हाेत नसल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे. काेराेना संकटकाळात नागरिकांना हाेणारा दैनंदिन त्रास लक्षात घेता, या माकडांना पकडून जंगलात साेडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.