लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी नागपुरात १३ ते १५ जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होते. मात्र यंदा मान्सूनने आश्चर्याचा धक्का दिला असून बुधवारीच तो उपराजधानीत दाखल झाला. हवामान खात्याचा अंदाजदेखील अपयशी ठरला असून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे.
मागील काही दिवसांपासून विदर्भात पावसाचे वातावरण आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊसदेखील बरसला. हवामान खात्याने १२ ते १४ जूनदरम्यान विदर्भात मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तविला होता. मात्र प्रत्यक्षात बुधवारीच मान्सून नागपुरात दाखल झाल्याचे खात्याने जाहीर केले.
विदर्भातील अनेक भागातदेखील मान्सूनचे आगमन झाले आहे. २४ तासात चंद्रपूर वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. अकोल्यामध्ये ६६.४ मिमी पावसाची नोंद झाली तर बुलडाण्यात ३३ मिमी व नागपुरात १८.१ मिमी पाऊस पडला. पुढील चार ते पाच दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस राहील. शनिवार आणि रविवारी विदर्भातील गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सर्वदूर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक एम.एल.साहू यांनीदेखील याला दुजोरा दिला. नागपूरसह विदर्भातील ७० टक्के भागात मान्सून सक्रिय झाला आहे. यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. २४ तासांत संपूर्ण विदर्भात मान्सून पोहोचेल, असे ते म्हणाले.
मान्सूनचे विदर्भातील आगदन
वर्ष - तारीख२०१४ - १९ जून
२०१५-१३ जून
२०१६- १८ जून
२०१७-१६ जून
२०१८- ८ जून
२०१९- २२ जून
२०२०- १३ जून
२०२१ - ९ जून
विदर्भातील पाऊस
जिल्हा - पाऊस (मिमीमध्ये)
अकोला - ६६.४
अमरावती - ४.६
बुलडाणा - ३३.०
ब्रम्हपुरी - ४.४
चंद्रपूर - ०.०
गडचिरोली - १२.६
गोंदिया - ०.२
नागपूर - १८.१
वर्धा - १.०
वाशिम - ०.०
यवतमाळ - १२.२