लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या मान्सूनमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाच्या अनुशेषासह जलाशयेसुद्धा कोरडी पडली होती. परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे की, जलाशये ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे सध्यातरी नागपूरकर सुखावले आहेत. नागपुरात दरवर्षी सरासरी १०७४ मि.मी. इतका पाऊस होतो. आतापर्यंत नागपुरात १००४.४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. आतापर्यंतच्या तुलनेत तो १८ टक्के अधिक आहे. एकूण मोसमाचा विचार केल्यास वर्षभरातील सरासरीइतका पाऊस होण्यासाठी केवळ ७० मि.मी. पावसाची आवश्यकता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येणाऱ्या काही दिवसात आणखी पाऊस होणार आहे. परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे यंदा मान्सून सरासरी ओलांडणार अशी शक्यता दिसून येत आहे.विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४५ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आलेला आहे. यासोबतच नागपूर १८ टक्के अधिक पावसासह दुसºया क्रमांकावर आहे. चंद्रपूरमध्ये सरासरीपेक्षा १३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ४ टक्के, भंडारा १ आणि अकोला येथे सरासरी इतका पाऊस झाला आहे. दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती नाजूक आहे. येथे सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पाऊस पडला. वाशिममध्ये २९ टक्के कमी आणि गोंदियामध्ये सरासरीपेक्षा ८ टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे तेथील नागरिक चिंतेत आहेत. हवामान तज्ज्ञानुसार सप्टेंबर महिन्याच्या दुसºया पंधरवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच परत येतो. परंतु यंदा परतीच्या पावसालाही उशीर होण्याची शक्यता दिसून येत आहे.२४ तासात ३.४ डिग्री चढला पारापाऊस थांबल्याने व अधून-मधून कडक ऊन पडू लागल्याने तापमानात वाढ नोंदवण्यात आली. गेल्या २४ तासात नागपूरचे कमाल तापमान ३.४ डिग्रीपर्यंत वाढले आहे. परंतु किमान तापमान २ डिग्रीपेक्षा कमी आहे. दुसरीकडे रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा एक डिग्री अधिक आहे.