महापौरांनी घेतला आढावा : २३६ नाल्यांची स्वच्छता करणारनागपूर : अद्याप एप्रिल-मे महिन्याला सुरुवात व्हायची आहे. परंतु उन्हाळ्यापूर्वीच महापालिकेला पावसाळ्ळाची चिंता लागली असून, शहरातील २३६ नाल्यांची स्वच्छता करण्याची तयारी केली आहे. महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी बैठकीत याचा आढावा घेतला.सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य समितीचे सभापती देवेंद्र मेहर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर, अपर आयुक्त नयना गुंडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर आदी उपस्थित होते.झोननिहाय तयारीचा आढावा घेऊ न उन्हाळ्यात शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्याचे निर्देश दटके यांनी दिले. शहरातील ३६ नाल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. उर्वरित नाल्यांच्या कामासाठी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध केली जाणार असल्याचे डॉ. गणवीर यांनी सांगितले.पावसाळ्याला सुरुवात होताच काही भागात नाल्याची स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात काम हाती घेतले आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली. झोनस्तरावर याबाबतच्या निविदा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नाल्याच्या कामाचा दररोज आढावा घेतला जाणार आहे. ज्या भागातील नाल्याची स्वच्छता करावयाची आहे त्या प्रभागातील नगरसेवकांना याची पूर्वसूचना दिली जाणार आहे. झोनचे सहायक आयुक्त या कामावर नियंत्रण ठेवणार आहेत. (प्रतिनिधी)
उन्हाळ्यापूर्वीच मनपाला पावसाळ्याची चिंता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 3:31 AM