नागपूर : जवळपास १५ दिवस मुक्काम वाढविलेल्या पावसाने अखेर परतीचा प्रवास सुरू केला आहे. राजस्थानहून ६ ऑक्टाेबरला हा परतीचा प्रवास सुरू हाेणार असला, तरी पुढचा आठवडाभर उघडीप असल्याने यावर्षीचा पावसाळा संपल्यासारखा आहे. मात्र विदर्भातील काही जिल्ह्यात दाेन-तीन दिवस तुरळक पाऊस हाेण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. ('Monsoon Return' from October 6; Chance of sparse rain in Vidarbha)
साधारणत: १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रातून पाऊस आपला गाशा गुंडाळायला सुरुवात करताे, मात्र यावेळी त्याचा मुक्काम चांगलाच लांबला. बंगालच्या उपसागरात सातत्याने निर्माण हाेणारे कमी दाबाचे क्षेत्र, त्यानंतर ‘गुलाब’ चक्रीवादळाचा तडाखा यामुळे पावसाने परतीला १५ दिवस अधिक घेतले. मध्य प्रदेश, छत्तीसगड परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रानेही विदर्भात पावसाचा जाेर वाढविला. काही दिवस तर पावसाने चांगलेच झाेडपले. मराठवाडा आणि काेकण परिसरात तर पावसाने कहर केला. या पावसाने शेतातील पिकांना चांगलाच फटका बसला व शेतकऱ्यांना माेठे नुकसान सहन करावे लागले आहे.
विदर्भात साेयाबीन, कापूस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. २२ सप्टेंबरपासून पावसाने दरराेजची रिपरिप सुरू केली. नागपूरसह सर्व जिल्ह्यांत कधी मध्यम, तर कधी जाेराचा पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात पाऊस दिसेनासा झाला हाेता व त्यामुळे मान्सूनची तूट भरून निघेल की नाही, अशी शक्यता निर्माण झाली हाेती. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या जाेरदार पावसाने यावर्षीची केवळ तूट भरून काढली नाही, तर बहुतेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नाेंदविला गेला.
‘शाहीन’ करणार नाही नुकसान
‘गुलाब’नंतर ‘शाहीन’ चक्रीवादळाने अरबी समुद्रात धडक दिली आहे आणि पुढच्या २४ तासांत त्याचा जाेर वाढणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला; मात्र यामुळे काेकण व मध्य महाराष्ट्रात हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस हाेईल. हे वादळ पुढे गुजरातकडून ओमानकडे वळणार आहे.
...तरीही या जिल्ह्यात तुटवडा
पूर्ण सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र जाेरदार पावसाने धडक दिली. विदर्भातही चांगला पाऊस झाला; मात्र विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा तुटवडा कायम आहे. अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७ टक्के तूट राहिली. गडचिराेलीत सर्वाधिक १३ टक्क्यांचा तुटवडा आहे. गाेंदिया ७ टक्के, तर भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३ टक्के पावसाची कमतरता आहे.
गडचिराेली, बुलढाण्यात हजेरी
दरम्यान, शुक्रवारी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत वातावरण काेरडे हाेते. बुलडाणा व गडचिराेलीत पावसाने हजेरी लावली. बुलडाण्यात १० मिमी, तर गडचिराेलीत ७ मिमी पाऊस झाला. चंद्रपूरला १ मिमी पावसाची नाेंद झाली. तापमानात सरासरी १.५ अंशाची वाढ झाली आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अकाेल्यातील तापमान ३४ अंशावर पाेहोचले.