नागपूर : राजस्थानात ८१ दिवस मुक्काम केल्यानंतर पाकिस्तान सीमेलगतच्या भागातून मौसमी पावसाने मंगळवारपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यानुसार ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला हाेता. मात्र येते चार दिवस पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने बदललेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातून मान्सून गमन उशिरा हाेईल की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशातून राजस्थानच्या अतिवायव्येकडील टोकाकडून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची घाेषणा हवामान विभागाने केली आहे. हा प्रवास करीत ताे १ ते ५ ऑक्टाेबर दरम्यान महाराष्ट्रातूनही परतीचा प्रवास करीत निघून जाईल, असा अंदाज हाेता. साधारणत: १ सप्टेंबर पासूनच देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू हाेताे. व ३० सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातून निघून ताे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर स्थिरावताे, असे निश्चित मानले जाते. मात्र गेल्या वर्षीच हा निश्चित काळ बदलला. २०२१ मध्ये पाऊस उशिरा सुरू झाला आणि उशिराच निघून गेला. गेल्या वर्षी ६ ऑक्टाेबरला मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि तब्बल २३ ऑक्टाेबर नंतर ताे महाराष्ट्रातून निघाला हाेता. हवामान तज्ज्ञानुसार यावर्षी तेवढा वेळ लागणार नाही पण दरवर्षीच्या सरासरीपेक्षा उशिरा परतण्याची शक्यता नक्कीच आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरात बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आणि सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले असून ते पुढील दाेन दिवसात दक्षिण-पश्चिम दिशेने ओडिसा व छत्तीसगडकडे वळणार आहे. त्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत विदर्भासह मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मंगळवारी गडचिराेली येथे ३२ मिमी पाऊस झाला व जिल्ह्यातही जाेर हाेता. इतर जिल्ह्यात मात्र काेरड हाेती. नागपुरात ही आकाश काहीसे ढगाळलेले हाेते पण पाऊस झाला नाही. मात्र २४ सप्टेंबरपर्यंत पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. या वातावरणीय परिस्थितीमुळे राज्यातून परतीचा प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.