निशांत वानखेडेनागपूर : भारतीय हवामान विभागाकडून एक आनंदाची बातमी समाेर येत आहे. यंदा मान्सूनचे आगमन देशाच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजे केरळात ४ जूनच्या दरम्यान हाेण्याचा अंदाज विभागाने वर्तविला आहे. सरासरी १ जूनला केरळात आदळणारा मान्सून ४ दिवस उशीरा अपेक्षित असून केरळात १ जून ते ८ जून या ८ दिवसादरम्यान कधीही दाखल होऊ शकतो.
वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान, दक्षिण भारताच्या ४ राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे वर्तन, दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणारी दीर्घलहरी उष्णता ऊर्जा, मलेशिया थायलंड पश्चिम किनारपट्टीवर एक ते दिड किमी. दरम्यानचे वाहणारे वारे, वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब, बंगालच्या उपसागरातील बांगला देश इंडोनेशिया दरम्यानचा पण साधारण १० किमी. उंचीवरील वाहणारा वारा अशा ६ घटकांचे सतत निरीक्षण करून हा मान्सून आगमनाचा अंदाज बांधला जातो.
सरासरी १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून पुढे म्हणजे साधारण १० जूनला मुंबईत सलामी देतो. तो कदाचित यावर्षी १५ जूनला मुंबईत दाखल होऊ शकतो. त्यातही कमी अधिक ४ दिवसाचा फरक विचारात घेतला तर मुंबईत १० ते १८ जूनच्या दरम्यान केव्हाही दाखल होऊ शकताे. अर्थात केरळात आगमन झाल्यानंतरच मुंबईतील त्याच्या आगमनाची तारखेचा अंदाज बांधता येईल.
मुंबईतल्या आगमनानंतरच उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरवता येईल. म्हणजेच आजपासून १ महिन्यानंतरच उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मान्सूनचे आगमन व ४ महिन्यात पडणारा मान्सून या दोन स्वतंत्र गोष्टी असून त्यांच्या भाकीतांचे निकषही स्वतंत्र आहेत. भारतीय हवामान विभागाकडून ३१ मे दरम्यान मान्सूनसंबंधी सुधारित अंदाज येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच मान्सूनची टक्केवारी व वितरणाचा अंदाज येईल.