लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मान्सूनच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आला. रविवारी दुपारी २.३० नंतर आलेल्या पावसामुळे शहरातील काही सखल भागात पाणीदेखील साचले. रात्री ८.३० वाजेपर्यंत शहरात ३४.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.शनिवारी नागपुरात मान्सून सक्रिय झाल्याची हवामान खात्याने घोषणा केली होती. परंतु त्यानंतर पाऊसच झाला नाही. त्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. रविवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत उन होते. त्यानंतर काळे ढग दाटून आले व सुरुवातीला थेंबथेंब पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच ढग गडगडायला लागले व वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास शहरात मुसळधार पाऊस झाला. पाऊस थांबल्यानंतर वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील ४८ तासात नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत मान्सूनची रेषा सूरत, नंदूरबार, बैतुल, सिवनी, पेंढरा रोड, अंबिकापूर, गया या मार्गाने पाटण्यापर्यंत पोहोचली आहे. विदर्भात जूनच्या दुसºया पंधरवड्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
आर्द्रतेमध्ये वाढदुपारपर्यंत शहरात उन होते. कमाल ३५.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. २४ तासातच पारा २.३ अंशांनी वाढला. सरासरीहून तापमान १.८ अंश सेल्सिअसने कमी होते तर किमान २४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सकाळी ८.३० वाजता ७६ टक्के आर्द्रता होती तर सायंकाळी हाच आकडा ९८ टक्क्यांवर पोहोचला होता.
चौक, ‘अंडरब्रिज’मध्ये पाणीच पाणीदीड तास कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. शहरातील काही चौक, रस्ते तसेच आरओबीमध्ये पाणीच पाणी होते. शंकरनगर चौक, जगनाड़े चौक, मेडिकल चौकाजवळ पाणी साचले होते व त्यामुळे नागरिकांनी अग्निशमन दलाला सूचना केली तर नरेंद्रनगर पूल, लोखंडी पूल, रामझुला, धंतोली अंडरब्रिज येथेदेखील पाणी साचले होते. बºयाच घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी विभागाकडे आल्या.