नागपूर : कोरोचा संक्रमणाची दुसरी लाट रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या महिनाभराच्या लॉकडाऊनमुळे शहरातील कोट्यवधींची कामे प्रभावित झाली आहेत. सोबतच हातावर पोट घेऊन जगणाऱ्या बांधकामावरील लाखो मजुरांवर हतबल होण्याची पाळी आली आहे.
नागपूर शहरात असलेल्या लहान-मोठ्या कंत्राटदारांची संख्या अडीच ते तीन हजाराच्या घरात आहे. प्रत्येक कंत्राटदाराकडे कमी-अधिक ४० ते ५० कामगारांची टीम आहे. लॉकडाऊनमुळे नागपूर शहरासह जिल्ह्याभरातील हार्डवेअरची दुकाने बंद आहेत. यामुळे बांधकामासाठी आवश्यक असणारे सिमेंट, लोखंड, प्लायवूड यासारख्या वस्तूंचा पुरवठा थांबला आहे.
प्रशासनाने एकीकडे वाहतुकीला परवानगी दिली असली तरी दुकानेच बंद असल्याने बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा थांबला आहे. यामुळे नाईलाजाने कंत्राटदारांना काम थांबवावे लागले आहे. शासकीय बांधकामासोबतच शहरात अनेक ठिकाणी खासगी बांधकामेही सुरू आहेत. सोमवारपासून लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. परिणामत: बांधकामावर राबणारे सुमारे एक ते सव्वालाख मजुरांच्या हातचे काम सुटले आहे.
...
कंत्राटदारांची शासनाकडे मागणी
लॉकडाऊनच्या काळामध्ये बांधकामे बंद करू नये. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मालाचा पुरवठा करण्यात अडचणी येऊ नये, अशा आशयाची मागणी क्रेडाई नागपूर मेट्रो या संघटनेने पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या पत्रात त्यांनी कामावरील मजुरांच्या परिस्थितीचाही उल्लेख केला आहे.
...
कोट
कामगार, आर्किटेक्ट, पुरवठादार या सर्वांनाच लॉकडाऊनचा फटका बसला आहे. काम जेवढे जास्त दिवस रेंगाळले तेवढा बांधकामावरील खर्च वाढतो. त्याचा ताण कंत्राटदारांवर येतो. यामुळे शासनाने काम बंद करू नये. संघटनेने यासंदर्भात निवेदन दिले आहे. त्यावर विचार व्हावा.
- महेश सादवानी, राज्य उपाध्यक्ष, क्रेडाई नागपूर मेट्रो
....