नागपूर : नागपूर शहरातून विविध ठिकाणी नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. परंतु जनरल कोच बंद असल्यामुळे या मासिक पासधारकांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. यात त्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून रेल्वे प्रशासनाने जनरल कोच सुरू करण्याची मागणी ते करीत आहेत.
नागपूरवरून वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, काटोल आदी ठिकाणी नोकरीनिमित्त अनेक कर्मचारी ये-जा करतात. कोरोनाच्या पूर्वी ते रेल्वेची मासिक पास काढून जनरल कोचने प्रवास करीत होते. परंतु कोरोनामुळे रेल्वे बोर्डाने नियमित रेल्वेगाड्या बंद केल्या. त्याऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. विशेष रेल्वेगाड्यात जनरल कोच नाहीत. त्यामुळे मासिक पास खरेदी करून नोकरीच्या ठिकाणी जाणारे मासिक पासधारक अडचणीत आले आहेत. त्यांना अधिक पैसे मोजून खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. खासगी वाहनांपेक्षा रेल्वे मार्गाने ते लवकर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचत होते. जनरल कोच नसल्यामुळे त्यांच्या वेळेचे आणि पैसे याचे नुकसान होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित जनरल कोच सुरू करून मासिक पासधारक प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
..............
पार्किंग कंत्राटदाराचेही नुकसान
जनरल कोच सुरू असताना मासिक पासधारक रेल्वेस्थानकावरील पार्किंगमध्ये आपली दुचाकी उभी करून बाहेरगावी जात होते. परंतु मागील ११ महिन्यापासून जनरल कोच बंद असल्यामुळे मासिक पासधारक पार्किंगमध्ये वाहने उभी करत नाहीत. याचा पार्किंगच्या कंत्राटदारालाही फटका बसला असूनल त्याचा दैनंदिन उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
मासिक पासधारकांना दिलासा द्यावा
रेल्वेने जनरल कोच बंद केल्यामुळे नोकरीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या मासिक पासधारकांची अडचण होत आहे. त्यांना अधिक रक्कम खर्च करून खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जनरल कोच सुरू करून मासिक पासधारकांना दिलासा देण्याची गरज आहे.
- बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र.