कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन
अदा करण्यास कंत्राटदारांकडून विलंब
खापरखेडा : औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन अदा करण्यास कंत्राटदारामार्फत विलंब होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. याचा फटका कंत्राटी कामगारांनाही बसला. अशात वेळेवर वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
लॉकडाऊन काळात राज्यभरातील जनता घरात असताना अंखडित वीजनिर्मिती करण्यात कंत्राटी कामगारांचे योगदान आहे. असे असले तरी महिन्याच्या ७ तारखेपूर्वी वेतन अदा करण्याच्या परिपत्रकांची संबंधित कंत्राटदार अंमलबजावणी करताना आढळून येत नाही. तसेच ईएल, बोनस ग्रॅच्युईटीची रक्कम प्रत्येक महिन्याच्या वेतनात अदा करीत नसून या मानकांची अवैधपणे कपात केली जाते. तसेच तीन महिने या रकमेचा कंत्राटदार वापर करतो, असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. वेतनात विविध तक्रारी व तफावत आढळून येते. शिवाय काही कंत्राटदारांकडून भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केला जात आहे. तसेच किमान वेतन कायद्यानुसार जादा कामाचा मोबदला प्रत्येक तासाचा दर दुप्पट दराने अदा केला जात नाही. वीजनिर्मितीच्या प्रत्येक निविदेच्या कार्यादेशामधे स्पष्ट नमूद आहे की, मुख्य नियोक्त्यातर्फे जर कंत्राटदाराला सहा महिन्यापर्यंत वेतन अदा होत नसेल तर कंत्राटदारास कामगारांचे मासिक वेतन नियमाप्रमाणे अदा करणे बंधनकारक आहे.