नागपूर : कुख्यात राजा गौससोबत नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पळालेला त्याच्या साथीदार दुचाकीने दगा दिल्याने पकडला गेला. चेनस्नॅचिंग करताना मोपेड घसरून पडल्याने तो खाली पडला व लोकांनी त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चौकशीदरम्यान त्याने वाहनचोरीसह पाच गुन्हे केल्याची बाब समोर आली. छत्रपती चौकाजवळ हा प्रकार घडला. गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (३०, कुतूबशहानगर) असे आरोपीचे नाव आहे.
१२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता एक महिला जात असताना गोलूने तिच्या गळ्यातील चेन ओढण्याचा प्रयत्न केला. नेमक्या त्याच वेळी तो दुचाकीवरून (क्र. एमएच ३१ डब्लूएस ६६९६) खाली पडला. लोकांनी त्याला पकडले व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला येऊन ताब्यात घेतले. उपचारानंतर त्याची चौकशी केली असता त्याने संबंधित दुचाकी गंगाजमुना परिसरातून दुपारी २ वाजेच्या सुमारास चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत त्याची सखोल चौकशी केली असता त्याने एकूण तीन वाहनचोरी व तीन चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली दिली. एक दुचाकी त्याने निर्मलकुमार खिलवानी यांची दुचाकी नेताजी बाजारातून चोरी केली होती. बजाजनगरातून एक, सीताबर्डीतून दोन वाहने त्याने चोरली होती, तर सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन चेनस्नॅचिंग व सक्करदरा येथून एक चेनस्नॅचिंग केली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन दुचाक्या, २५ ग्रॅम सोने असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. उपायुक्त डॉ. संदीप पखाले, सहायक पोलीस आयुक्त नीलेश पारवे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभा एकुरके, व्ही. बी. फरताडे, सुभाष वासाडे, बाळू जाधव, विनोद चव्हाण, संजय तिवारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
राजा गौससोबत ‘जेल ब्रेक’
गोलू हा राजा गौससोबत २०१५ साली नागपूर मध्यवर्ती कारागृहातून फरार झाला होता, तेव्हापासून तो फरारच होता. तो दुचाकी चोरी करून त्याच दुचाकीने चेनस्नॅचिंगचे गुन्हे करायचा. गुन्हा झाला की तो दुचाकी कुठेही बेवारस सोडून द्यायचा.