पाच विद्यार्थी संघटनांनी दिली धडक : बीए, बीकॉमच्या कमी निकालाबाबत असंतोषनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मोर्चा येणे ही काही नवीन बाब नाही. परंतु मंगळवार हा विद्यापीठात अक्षरश: ‘मोर्चा’वार ठरला. एकाच दिवशी पाच संघटनांनी विविध मागण्यांसाठी विद्यापीठात धडक दिली. मोर्चातील पदाधिकाऱ्यांचा सामना करताना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले होते.विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेले आहेत. त्यातच बीकॉम व बीएच्या प्रथम वर्षांचे निकाल अवघे १८ व २० टक्के इतकेच लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यावरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सर्वात अगोदर दुपारी १२ च्या सुमारास महाविद्यालयातील प्रवेश समस्येची तक्रार घेऊन पारशिवनीच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा आला. त्यांनी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेतली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात धडक दिली व रखडलेल्या निकालांबाबत कुलगुरूंकडे विचारणा केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास आम आदमी पक्षासोबत जुळलेली विद्यार्थी संघटना छात्र युवा संघर्ष समितीचे कार्यकर्ते विद्यापीठात पोहोचले. मागील आठवड्यातच या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी काही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी विद्यापीठात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. या कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकात ‘भिक मांगो’ आंदोलनदेखील केले. परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, निकाल लवकर लावावेत, इत्यादी त्यांच्या मागण्या होत्या.भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीदेखील विद्यापीठात धडक दिली. मूल्यांकन सदोष असल्यामुळे सर्व मुलांना उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स विनाशुल्क देण्यात याव्या. चुकीचे मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांची नावे जाहीर करून त्यांना दंड आकारण्यात यावा व पाच वर्षे परीक्षा कामापासून दूर ठेवावे. पुनर्मूल्यांकनाचे निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा, आदी मागण्ण्या यावेळी करण्यात आल्या.(प्रतिनिधी)ग्रंथालय सुटीच्या दिवशी सुरू ठेवा१ मेपासून विद्यापीठाचे वि.भि. कोलते मध्यवर्ती ग्रंथालय शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्यांच्या वेळी बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचण जाते. अशा परिस्थितीत ग्रंथालय सर्वच दिवशी सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना देण्यात आले.
विद्यापीठात ‘मोर्चा’वार
By admin | Published: August 12, 2015 3:50 AM