लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वाढीव वीज बिलाच्या संबंधाने निषेध आंदोलन करणारे विदर्भवादी नेते वामनराव चटप, राम नेवलेंसह ७० आंदोलकांवर जरीपटका ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
कोरोना काळातील सर्व वीज बिल माफ करावे आणि वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. ॲड. वामनराव चटप, राम नेवले यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाला पोलिसांनी बेझनबाग चौकात अडविले. तेथे दुपारी २.३० च्या सुमारास पोलिसांची मोर्चेकऱ्यांसोबत हमरीतुमरी झाली. त्यानंतर सौम्य बळाचा वापर करीत पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. यासंबंधाने जरीपटका पोलीस ठाण्यात ॲड. चटप, नेवले, मुकेश मासूरकर, गणेश राधामोहन शर्मा, नरेश निमजे, विजय माैंदेकर, धीरज मंदारे, योगेश मुरेकर, कपिल उके, नितीन भागवत, तुषार कराडे, अनंता गोडे, साैरभ गभणे, प्रशांत जयकुमार, सुनील वायकर, विनोद गावंडे, ऋषभ गजानन वानखेडे, पराग गुंडेवार, अरविंद बावीस्कर, कल्पना बोरकर, जया शंकर, पूजा वांढरे, उषा क्रिष्णराव अवट, सुनीला येरणे, ज्योती खांडेकर, प्रीती चांदूरकर, माधुरी चव्हाण, रंजना भामर्डे, देवीदास पडोळे, अरुण बासलवार, अरुण केदार, योगेश मोरकर आणि त्यांच्या १५ साथीदारांविरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
हे आहेत आरोप
परवानगी नसताना मोर्चा काढणे, पोलिसांना शिवीगाळ करणे, पाहून घेण्याची धमकी देणे तसेच पोलिसांसोबत धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा आरोप या सर्व मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी लावला आहे.