नागपूर : दिवाळी हा उत्साहाचा सण. अनेकजण फटाके फोडून आनंद साजरा करतात. परंतु फटाके फोडताना खबरदारी घेत नसल्याने आनंदाऐवजी काहींना दु:खदायक घटनेला सामोरे जावे लागते. गेल्या काही वर्षांत याचे प्रमाण कमी झाले असले तरी सोमवारी फटाके फोडत असताना जवळपास शंभरावर लोक जखमी झाले. यात तिघांच्या डोळ्यांना इजा झाली असून, इतरांमध्ये कोणाचा हात, तर कोणाचा पाय भाजला.
फटाके फोडताना आवश्यक गोष्टींची दक्षता घेणे गरजेचे आहे. असे न झाल्यास अनेकांची दिवाळी अंधारात जाते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) फटाक्यांमुळे हात व इतर भागातील त्वचा जळलेल्या सात रुग्णांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले. यात पाच व दहा वर्षांंच्या मुलाचा समावेश होता. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) फटाक्यांमुळे भाजलेल्या ११ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील २२, २७ व ४२ वर्षीय पुरुषांच्या डोळ्यांना जखम झाली. परंतु जखम गंभीर नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरातील विविध खासगी इस्पितळातही रात्री उशिरापर्यंत भाजलेल्या जवळपास ७७ पेक्षा अधिक रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आहे.
- खासगी इस्पितळातही गर्दी
फटाक्यांमुळे जखमी झालेल्या रुग्णांनी शहरातील विविध खासगी इस्पितळात उपचार घेतले. डॉ. पिनाक दंदे यांनी सांगितले की, सोमवारी १२ रुग्णांवर उपचार केले. यात लहान मुलांची संख्या मोठी होती. यात एकाच्या हातात अनार फुटल्याने हात जळला. काहींच्या डोळ्यांना जखम झाली होती, तर काहींची त्वचा भाजली होती. या सर्वांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले.