लोकत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील नागरिक अद्यापही माहिती लपवीत असल्याने तेथील बहुतांश लोकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत विलगीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांचा आकडा अंदाजे १२०० च्या घरात पोहचेल, अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे मनपाची चमू दररोज या परिसरात सर्वेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्थंभूत माहिती विचारीत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्वेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली. कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे २०० वर नागरिकांनीही अशीच माहिती लपविली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. त्यातीलच पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा ८० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. आताच उपाययोजना केल्या नाही तर संसर्गाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तेथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी १००, आजच्या तारखेत ४५० नागरिकांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली असून, उद्यापर्यंत हा आकडा १२०० च्या घरात जाईल, असेही त्यांनी सांगितले.मनपा चमूला खरी माहिती पुरवा. समाजाचे शत्रू बनू नका. मानवतेचे दूत बना, असे आवाहन पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांनी केले आहे.संगमनगर परिसर सीलनागपूर महापालिका हद्दीतील आसीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक तीनमधील संगमनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी दिले. या आदेशानुसार आसीनगर २ क्रमांक ९ अंतर्गत असलेल्या प्रभागमधील संगमनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. त्यात दक्षिण-पश्चिमेस विटा भट्टी चौक, दक्षिणेस- पिवळी नदी वाजरा पूल, उत्तर-पश्चिमेस- नंदी चौक, रिंग रोड, उत्तरेस -पिवळी नदी, यशोधरानगर, मनपा शाळा या क्षेत्राचा समावेश आहे.प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे पासधारक व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.