लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वसतिगृहातील समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने विद्यार्थ्यांसोबतच निवासी डॉक्टरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ‘मार्ड’ वसतिगृहात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने सुमारे ३० वर निवासी डॉक्टर गॅस्ट्रोच्या विळख्यात सापडल्याची माहिती आहे.मेडिकलमध्ये ‘एमएबीबीएस’ अभ्यासक्रमासाठी दरवर्षी २०० नव्या विद्यार्थ्यांची भर पडते. या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी पाच वसतिगृहे आहेत. यातील दोन वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनी तर तीन वसतिगृहांमध्ये विद्यार्थी राहतात. वसतिगृहातील गटारलाईन जुन्या व मोडकळीस आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गटारलाईन तुंबल्याने घाण पाणी साचून राहत आहे. परिणामी, दुर्गंधी व इतरही समस्येला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. याची तक्रार करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत. यातच गेल्या काही दिवसांपासून मेडिकलमध्ये पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. मागणीच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा होत आहे. वसतिगृहातही पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वसतिगृहात वॉटर फिल्टर असले तरी त्याच्या देखभालीकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वसतिगृहांमध्ये सर्वात जुने असलेल्या ‘मार्ड’ वसतिगृहातही जुन्याच सोयींवर निवासी डॉक्टरांचा भार आहे. येथेही पाणी समस्या आहे. काही ‘वॉटर फिल्टर’ बंद करून ठेवले आहेत, जे सुरू आहेत त्या सभोवताल घाण साचली आहे. पाणी ‘फिल्टर’ होत आहे किंवा नाही, याबाबत शंकाही उपस्थित केली जात आहे. येथील निवासी डॉक्टरांच्या मते, एकट्या मार्ड वसतिगृहात ३० वर डॉक्टरांना गॅस्ट्रोची लक्षणे आढळून आली आहेत, यातील काही औषधोपचार घेऊन बरे झाले तर काहींवर अजूनही औषधोपचार सुरू आहेत. यातून मेडिकल मार्डचे अध्यक्षही सुटले नसल्याची माहिती आहे. सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत, यातच आजार वाढल्याने डॉक्टर अडचणीत आले आहेत.
नागपुरात ३० हून अधिक निवासी डॉक्टरांना गॅस्ट्रोने पछाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:29 AM
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वसतिगृहातील समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने विद्यार्थ्यांसोबतच निवासी डॉक्टरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
ठळक मुद्दे‘मार्ड’सह इतरही वसतिगृहात दूषित पाणी पुरवठ्याची शंका