योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आठवड्याभरापासून नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडादेखील वाढला आहे. १८ एप्रिलपासून जिल्ह्यामध्ये ४० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अनेकांनी तर प्रतिकूल परिस्थितीतदेखील कोरोनावर मात केली. रुग्णांनी सकारात्मक मानसिकता ठेवली, तर ठीक होण्याचा वेग वाढतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
१८ ते २४ एप्रिल या कालावधीत एकाच दिवशी सर्वाधिक कोरोनाबाधितांचा विक्रम झाला. २४ एप्रिल रोजी ७ हजार ९९९ कोरोनाबाधित आढळले, तर १९ एप्रिल रोजी ११३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे कोरोनाला हरवून ठणठणीत होणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. सात दिवसांत ४० हजार ९६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. २१ एप्रिल रोजी तर कोरोनाबाधितांपेक्षा कोरोमामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्या २४ तासांत ७ हजार २६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. १८ एप्रिलपासून सात दिवसांत दररोज सरासरी ५ हजार ८५२ रुग्ण कोरोनातून बाहेर आले आहेत.
चाचण्यांची संख्यादेखील वाढीस
आठवड्याभरापासून चाचण्यांची संख्यादेखील वाढीस लागली आहे. १८ ते २४ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ४३१ चाचण्या झाल्या. यातील ५० हजार ३१७ पॉझिटिव्ह आढळले, तर तब्बल १ लाख १६ हजार ११४ जण निगेटिव्ह होते. निगेटिव्ह आढळलेल्यांची टक्केवारी जवळपास ७० टक्के इतकी होती. लक्षणे आढळली, तर आपण पॉझिटिव्ह होऊच ही भीती मनातून काढत लोकांनी चाचण्यांसाठी पुढाकार घेतला पाहिजे. चाचणी करणारा प्रत्येक जण पॉझिटिव्ह आढळतोच असे नाही, हेच या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
ज्येष्ठांनीदेखील हरविले कोरोनाला
कोरोना झाल्यानंतर हताश न होता अनेक ज्येष्ठ नागरिकांनीदेखील कोरोनाला हरविले. योग्य उपचार व सकारात्मकतेतूनच हे शक्य होऊ शकते, असे या ज्येष्ठांचे मत आहे. ९२ वर्षीय रुक्माबाई धांडे यांनी कोरोनावर मात करून जिद्द काय असते, हे तरुणाईला दाखवून दिले आहे. कोरोना झाल्यानंतर घाबरण्याची आवश्यकता नाही. वैद्यकीय सल्ला घेऊन त्याचे पूर्णतः पालन व सकारात्मकता याद्वारे कोरोनामधून बाहेर पडता येते, असे त्यांनी सांगितले.
आठवड्याभरातील स्थिती
एकूण चाचण्या – १,६६,४३१
पॉझिटिव्ह – ५०, ३१७
बरे झालेले रुग्ण – ४०, ९६३
आतापर्यंतची आकडेवारी (२४ एप्रिलपर्यंत)
एकूण चाचण्या – २१,३३,६९६
पॉझिटिव्ह – ३,६६,४१७
बरे झालेले रुग्ण – २,८४,५६६
आठवड्याभरातील कोरोनामुक्त
दिनांक - कोरोनामुक्त
१८ एप्रिल- ३,९८७
१९ एप्रिल – ५,०९७
२० एप्रिल – ५,५०४
२१ एप्रिल – ७,२६६
२२ एप्रिल – ६,३१४
२३ एप्रिल – ६,५३१
२४ एप्रिल – ६,२६४
हिंमत ठेवा, सकारात्मक राहा
मनातील भीतीचा थेट मानसिक व शारीरिक प्रभाव पडतो. भीती दाटल्यास शरीरातील प्रतिकारशक्ती ४८ तासांपासून कमी व्हायला लागते. मनातील भीती आपल्याला गंभीर आजाराकडे नेऊ शकते. भीतीमुळे हृदयाचे ठोके वाढतात. त्याचा परिणाम ऑक्सिजन लेव्हलवर होतो. त्यामुळे भीती बाळगणे सोडा. मनावर नियंत्रण ठेवा, सकारात्मक राहा.
-डॉ. सुशील गावंडे, मानसोपचारज्ज्ञ