नागपूर (कोंढाळी) : राज्याचा पशुसंवर्धन विभाग बर्ड फ्ल्यूचा धोका नसल्याचे सांगत असला तरी नागपूर नजीकच्या कोंढाळी भागातील रिंगणाबोडी, माणिकवाडा, मसाळा, शिवा, आकेवाडा आदी भागात ५०० हून अधिक चिमन्या, पोपट, कावळे आदी पक्षांचा मृत्यू झाला आहे.
पक्षांचा हा मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला हे अद्याप जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र परिसरात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे स्थानिक पशुपालकात भितीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात रिंगणाबोडी येथील पोलीस पाटील संजय नागपूरे यांनी कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांना माहिती दिली.
काटोल तालुका पशुधन अधिकारी व कोंढाळीचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ.तुषार पुंड व सुधीर कापसीकर विविध गावांना भेट देवून या प्रकाराची माहिती घेत आहे. पक्षांचा हा मृत्यू कशामुळे झाला हे वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट करण्यात येईल, असे पशुसंवर्धन विभागाच्या स्थानिक अधिका-यांनी सांगितले आहे.