नागपूर : प्रशासकीय पातळीवर पारदर्शक पद्धतीने काम सुरू आहे की नाही, याची माहिती जनसामान्यांनादेखील सहजपणे उपलब्ध व्हावी, या उद्देशातून माहितीचा अधिकार अस्तित्वात आला. याबाबत नागरिकांमध्ये नेमकी किती जागृती आली हा संशोधनाचा विषय असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात या अधिकाराचा अनोखा विक्रमच झाला आहे. एकाच व्यक्तीने थोडेथोडके नव्हे तर ७ हजारांहून अधिक ‘आरटीआय’ अर्ज केले आहेत. ही व्यक्ती कोण हे सांगण्यास प्रशासनाने नकार दिला असला तरी अति जास्त प्रमाणात माहिती मागणा-यांना अपात्र करण्याचा अधिकाºयांचा विचार सुरू आहे.
विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहणा-या नागपूर विद्यापीठाकडे दररोजच माहितीच्या अधिकाराचे अर्ज येत असतात. मात्र २००५ साली हा कायदा लागू झाल्यापासून एका व्यक्तीने प्रचंड प्रमाणात माहिती अधिकाराचे अर्ज दिले आहेत. आतापर्यंत एकाच व्यक्तीने ७ हजार ३५ अर्ज सादर केले आहेत. गेल्या १२ वर्षांतील सुटीचे दिवस वगळले तर दिवसाला २ अर्ज विद्यापीठाकडे एकाच व्यक्तीकडून आले आहेत. हा ‘आरटीआय’चा अनोखा विक्रमच म्हणावा लागेल. संबंधित व्यक्ती कोण आहे, हे सांगण्यास कुलसचिव पूरण मेश्राम यांनी नकार दिला.
दरम्यान, नागपूर विद्यापीठ प्रशासनाकडे अति जास्त प्रमाणात माहिती अधिकाराचे अर्ज येत आहेत. अनावश्यक व जास्त प्रमाणात माहिती अधिकाराचा उपयोग करणाºयांना अपात्र करता येईल का, या संबंधांत विचार सुरू असल्याची माहिती पूरण मेश्राम यांनी दिली.
...तर ‘आरटीआय’अंतर्गत मिळणार नाही माहिती
नवी दिल्ली येथे केंद्रीय माहिती आयुक्तांनी एक निर्णय देताना अतिरिक्त व अनावश्यकपणे माहिती अधिकाराचा अर्ज करणे अयोग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. अशा व्यक्तीला अपात्र करण्यात यावे तसेच फौजदारी गुन्हादेखील दाखल होऊ शकतो, असे यात स्पष्ट करण्यात आले होते. नागपूर विद्यापीठात काही जणांकडून जाणुनबुजून अनावश्यकपणे माहिती मागण्यात येते. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे संबंधित निर्णयाचा अभ्यास करुन नागपूर विद्यापीठातदेखील अशा पद्धतीने अतिजास्त प्रमाणात माहिती मागणाºयांना अपात्र करता येईल का याची चाचपणी करणार असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.