लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पडले. कोरोनाचे संकट असतानादेखील मतदारांमध्ये उत्साह दिसून आला व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४३ जागांवर ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. काही मतदारसंघांत मतदानादरम्यान हिंसाचारामुळे तणाव निर्माण झाला होता.
४३ जागांमध्ये उत्तर २४ परगणा, उत्तर दिनाजपूर, पूर्व बर्धवान, नदिया या जिल्ह्यांचा समावेश होता. सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या कालावधीत मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारांची मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचा दावा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला. निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या हजारहून अधिक तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
१४ हजार ४८० केंद्रांपैकी ७ हजार ४६६ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून थेट नजर ठेवण्यात आली. उत्तर २४ परगणाच्या काही भागांमध्ये मतदानादरम्यान हिंसा झाली. भाजपा व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी तणाव निर्माण झाला. टिटागड, खडदह, भाटपाडा इत्यादी ठिकाणीदेखील हाणामारीच्या घटनांची नोंद झाली.