निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालपणापासून संगीत आणि तबल्याप्रति प्रचंड ओढ मनात होती. पण स्त्री म्हणून सुरुवातीला काही चटकेही सहन करावे लागले. केवळ आवड म्हणून मी सुरुवातीला तबला वाजविण्यास सुरुवात केली. सात वर्षाची असताना तबला शिकण्यासाठी एका गुरूकडे गेले. मात्र ‘तू मुलगी आहेस, तबलावादन ही साधी गोष्ट नाही व तुला हे जमणार नाही’ असे म्हणत त्यांनी शिकविण्यास चक्क नकार दिला. समाजाचा दृष्टिकोनही तसाच होता. कदाचित या भेदामुळे मला वादन शिकण्यासाठी अधिक समर्पित केले. काही महिन्यानंतर मला सादरीकरण करताना पाहून त्यांनाच पश्चाताप झाला. काही मिळविण्यासाठी समर्पण व परिश्रम घेण्याची तयारी असेल तर ईश्वरही तुम्हाला मदत करतो, माझ्याबाबतही तसेच झाले. देशातील पहिली प्रोफेशनल तबलावादक पंडिता अनुराधा पाल यांनी व्यक्त केलेले हे मनोगत.कालिदास महोत्सवात सादरीकरणासाठी आलेल्या पाल यांनी लोकमतशी संवाद साधला. अनेकांची कृपादृष्टीही माझ्यावर झाली. पाच वर्षाची असताना एकदा झाकीर हुसेन यांच्या कार्यक्रमादरम्यान अनावधानाने त्यांच्या रुममध्ये ठेवलेला तबला वाजवायला लागले. मला पाहून त्यांनी जवळ घेत कोरात बसवून तबलावादन करण्यास सांगितल्याची आठवण त्यांनी सांगितली. उस्ताद अल्ला रख्खा यांनीही तेवढ्याच प्रेमळ भावनेने तालीम दिल्याचे त्या म्हणाल्या. झाकीर हुसेन व अल्ला रख्खा यांची रियाझ घेण्याची पद्धत अतिशय कठोर आहे. पण मी मनाशी पूर्ण समर्पणाची खुणगाठ बांधली होती. ‘माझ्याकडून कितीही परिश्रम करून घ्या, पण कुठलीही कमतरता राहू नये, अशी तालीम द्या’ हा आग्रहच मी माझ्या गुरूंना केला. गुरू-शिष्य परंपरेनुसार जे परिश्रम घ्यावे लागते, तशी तालीम मी केली. गुरूकडून आपण केवळ ज्ञान घेत नाही तर जीवनाचा संपूर्ण व्यवहार शिकत असल्याचे त्या म्हणाल्या.१४ वर्षाच्या असताना नागपुरात त्यांनी सादरीकरण केले होते. त्यांनी सांगितले, एक मुलगी असल्याने व कोणताही मोठा वारसा नसल्याने मला जो भेद सहन करावा लागला तो इतर महिलांना करावालागू नये म्हणून ‘स्त्रीशक्ती’ या बॅन्डची स्थापना केली. त्यात देशभरातील महिला कलावंतांना संधी देत आहे. पारंपरिक संगीताचा आधुनिकतेशी मेळ घालून श्रोत्यांना जोडण्याचा प्रयत्न आम्ही करतो. दरवेळी नाविन्य देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. इंटरनेटच्या जगात प्रत्येक वेळी तेच ते सादरीकरण लोकांना आवडणे शक्य नाही. हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीताच्या समन्वयातून गायन, वादन व सादरीकरणाचा आविष्कार प्रत्येक वेळी करीत असतो. श्रोत्यांनी लेडी झाकीर हुसेन हे बिरुद लावले असले तरी मी त्यांच्या बरोबर नाही. मी केवळ त्यांचा वारसा पुढे चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लिंगभेदाच्या चटक्याने अधिक समर्पित झाले; अनुराधा पाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:43 AM
बालपणापासून संगीत आणि तबल्याप्रति प्रचंड ओढ मनात होती. पण स्त्री म्हणून सुरुवातीला काही चटकेही सहन करावे लागले.
ठळक मुद्देपहिल्या महिला तबला वादकाचे मनोगत