नागपूर : आजचे युग हे डिजिटलतंत्रज्ञानाचे आहे. डिजिटल हा परवलीचा शब्द झाला आहे. जग ज्या वेगाने पुढे जात आहे त्यात डिजिटल तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असून डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मिहान सेझमधील टेक महिंद्राच्या डिजिटल डिलिव्हरी सेंटरचे उद्घाटन झाले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी, टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ सी. पी. गुरनानी प्रामुख्याने उपस्थित होते. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. आज सर्वत्र वापरात असलेली युपीआय डिजिटल पेमेंट सिस्टिम हा या बदलाचा एक भाग आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात या डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागात संवादाचे जाळे विस्तारले. या सेंटरच्या माध्यमातून सुमारे पंधराशे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध हाेईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
नितीन गडकरी म्हणाले, देशाच्या मध्यवर्ती असल्याने विविध भागांतील तरुण नागपुरात रोजगाराच्या शोधात येतात. या तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होण्याची गरज आहे. यासाठी मिहान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. राजेश चंद्रमणी यांनी आभार मानले.