योगेश पांडे
नागपूर : महिला अथवा मुलीला तिच्यावर झालेल्या अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ मिळवून देण्याच्या उद्देशाने नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘भरोसा’ सेलकडे पती-पत्नीच्या वादांची प्रकरणे जास्त प्रमाणात येतात. एरवी प्रेमविवाह केल्यानंतर पुढे त्याची परिणिती वादात होते, असा अनेकांचा समज आहे; परंतु ‘भरोसा’ सेलकडे आलेल्या प्रकरणांपैकी ६८ टक्के तक्रारी या ‘अरेंज्ड मॅरेज’ झालेल्या दाम्पत्यांचीच आहेत. प्रेमविवाहाच्या तुलनेत ही संख्या फार जास्त आहे.
जानेवारी २०१७ ते एप्रिल २०२२ या कालावधीत ‘भरोसा’ सेलकडे १० हजार १७३ प्रकरणे दाखल झाली. यात प्रेमविवाह झाल्यावर पती-पत्नीमध्ये वाद विकोपाला गेल्यावर आलेल्या प्रकरणांची संख्या २ हजार ७७४ म्हणजेच २७ टक्के इतकी होती. तर नातेवाईक व घरच्यांच्या संमतीने लग्न ठरविलेल्या दाम्पत्याचा आकडा ६ हजार ९२७ इतका होता. प्रेमविवाहापेक्षा ‘अरेंज्ड मॅरेज’मध्येच जास्त वाद झाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
संयुक्त कुटुंबातील वादाच्या ४२ टक्के तक्रारी
या कालावधीत संयुक्त कुटुंबातील पती-पत्नींच्या वादाच्या ४ हजार २८३ तक्रारी आल्या. ही टक्केवारी ४२ टक्के इतकी आहे. तर विभक्त कुटुंबात राहणाऱ्या दाम्पत्याच्या वादाच्या ४ हजार ४७८ प्रकरणांची नोंद झाली.
दुसऱ्या विवाहाच्या कमी तक्रारी
भरोसा सेलकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने प्रथम व दुसऱ्या विवाहाच्या तक्रारी जास्त असतात. त्यातही प्रथम विवाहातून निर्माण होणाऱ्या वादांचे प्रमाण जास्त आहे. प्रथम विवाहातील वादातून ९ हजार १६० प्रकरणांची नोंद झाली, तर द्वितीय विवाहानंतरच्या भांडणामुळे ५४१ प्रकरणे नोंदविल्या गेली.
‘लिव्ह-इन’ व प्रेमप्रकरणातील वाददेखील ‘भरोसा’ सेलकडे
केवळ पती-पत्नी किंवा ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर ‘लिव्ह-इन’मध्ये राहणारे तसेच प्रेमप्रकरण सुरू असलेल्या अविवाहित ‘कपल्स’च्या वादाच्या प्रकरणांचीदेखील ‘भरोसा’ सेलकडे नोंद झाली आहे. २०१७ पासून ‘लिव्ह इन’मधील वादातून ५९, तर प्रेमप्रकरणातील भांडणातून अविवाहित ‘कपल्स’च्या तक्रारीनंतर ९१ प्रकरणे नोंदविण्यात आली.