लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यात येते. २०१७ सालापासून ३७ महिन्यात नागपुरात मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी सव्वापाच हजाराहून अधिक नागरिकांना मदत मिळाली. आर्थिक निधीचा आकडा हा ५१ कोटींहून अधिक होता. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मुख्यमंत्री सचिवालयाकडे विचारणा केली होती. २०१७ सालापासून नागपुरातील नागरिकांना वैद्यकीय कारणांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून किती रुपयांची मदत झाली, किती नागरिकांचे अर्ज आले, यातील किती अर्ज नाकारण्यात आले, इत्यादी प्रश्न माहितीच्या अधिकारांतर्गत विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, ५ जानेवारी २०१७ ते २७ जानेवारी २०२० या कालावधीत नागपूर येथील मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाकडे ९ हजार २१५ नागरिकांचे अर्ज आले. यातील ३ हजार ७८२ अर्ज फेटाळण्यात आले व प्रत्यक्षात ५ हजार ४३३ नागरिकांचे अर्ज मंजूर झाले. वैद्यकीय उपचारांसाठी या कालावधीत एकूण ५१ कोटी ७६ लाख ४० हजार ५०० रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. सरासरी प्रत्येकाला ९५ हजार २७७ रुपयांची मदत झाली.नवीन सरकारच्या काळात ९० लाखांची मदत५ जानेवारी २०१७ ते ११ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ५ हजार ३८२ जणांना ५० कोटी ८५ लाख ५५ हजार ५०० रुपयांची मदत करण्यात आली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर १८ डिसेंबर २०१९ ते २७ जानेवारी २०२० या कालावधीत ३०० अर्ज प्राप्त झाले. यातील १५१ जणांना वैद्यकीय उपचारांसाठी ९० लाख ८५ हजारांचे अर्थसाहाय्य मिळाले.