लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने कोरोना रुग्णालयांवरील ताणही कमी होत आहे; परंतु तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता बेसावध राहून चालणार नही. यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.
नागपूर शहरातील शासकीय व खासगी कोरोना रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी ७ हजार ७४५ पैकी ५ हजार २५२ बेड खाली होते. यात ऑक्सिजनचे ३ हजार ७६२, आयसीयू १२६३ तर व्हेंटिलेटर २२५ बेड खाली आहेत.
१६ ते २१ एप्रिलचा विचार करता शहरात दररोज ४५०० ते ५००० हजारांच्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत; मात्र मृत्युचा आकडा ६० ते ७० पर्यंत पोहोचला होता. १८ एप्रिलला तर शहरात ७७ जणांचा मृत्यू झाला. शहरातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणात होते. घरीच उपचार घेताना प्रकृती गंभीर झाल्यानंतर ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मृत्युचा आकडा वाढला होता. उपचाराधीन रुग्णांची संख्या ५० हजारापर्यंत गेली होती.
गेल्या काही दिवसांमध्ये हे चित्र बदलले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मंळवारी नागपूर शहरात २१३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर ४ जणांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, असा दावा प्रशासनामार्फत केला जात आहे. रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे, तसेच रुग्णांना वेळीच उपचार देण्यात येत असून, यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.
....
लहान मुलासाठी १०० बेडची व्यवस्था
तिसऱ्या लाटेसाठी तयारीच्या दृष्टीने मनपाच्या पाचपावली, के.टी.नगर, इंदिरा गांधी रुग्णालयात किमान १०० बेडचे लहान मुलांसाठी तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या दृष्टीने मनपा प्रशासनाची तयारी असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत दिली.
..
उपचाराची त्रिसूत्री
म्युकरमायकोसिसचा प्रभाव वाढत आहे. याचा विचार करता महिनाभरापूर्वी जे कोविडचे रुग्ण दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस रुग्णालयात होते. ज्यांना मधुमेह आहे, अशा रुग्णांना कोरोना नियंत्रण कक्षातून काळी बुरशीच्या लक्षणांविषयी फोन करून विचारणा करण्यात येईल. ज्यांना लक्षणे आढळली त्यांच्यापर्यंत ४८ तासांच्या आत मनपाची चमू पोहोचेल. काही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष शिबिरांचेही आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. रुग्णांचा शोध, लवकर निदान आणि तातडीने उपचार ही त्रीसूत्री मनपा प्रशासन अमलात आणत आहे.