लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिसऱ्या लाटेचा अंदाज वैद्यकीय जगताकडून वर्तविण्यात येत आहे. सणासुदीमुळे नागरिकांची गर्दी वाढल्याचे दिसत आहे. नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी लसीकरणच प्रभावी आहे. त्यासाठी लसीकरण कमी असलेल्या तालुक्यात गती वाढवून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घेण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी गुरुवारी दिले.
जिल्हा कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ग्रामीण राहुल माकणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर लखोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र काटोलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रामटेक, कुही, कामठी या तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे, लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात यावी. अंथरुणाला खिळलेले रुग्ण व गरोदर मातांना प्राधान्य द्यावे. खासगी एफ. एम व रेडिओद्वारे लसीकरणाबाबत विविध समाजघटकांमार्फत जागरुकता करण्याबाबत विमला आर. यांनी यावेळी निर्देशित केले.
लसीकरण मोहिमेत लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा आहे. गावपातळीवरील सरपंच, नगरपालिका, नगर परिषद स्तरावर त्या त्या भागातील नगरसेवकांनी व प्रतिष्ठित नागरिकांनी इतरांना प्रोत्साहित करावे. स्वयंसेवी संस्था व खाजगी क्षेत्राचा सहभाग घेण्याची सूचना त्यांनी केली. गावपातळीवर आशा अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत असली तरी तिथे स्वयंसेवी काम करण्यास इच्छुक तरुण-तरुणींची या कामात मदत घ्यावी.गावात किमान दोन दिवस आधी गृहभेटीव्दारे नागरिकांना अवगत करावे तसेच नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यास त्यांनी सांगितले.
बॉक्स
- शासकीय कार्यालयातही लसीकरण होणार
लसीकरण मोहीम गतिशील करण्याचा एक भाग म्हणून शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा लसीकरण करण्यात येईल. शुक्रवारी जिल्हा परिषदेत लसीकरण होणार आहे. लवकरच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयातही लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.