२० ऑगस्टपर्यंत ४.५० लाखाचे उद्दिष्ट : झोन कार्यालयाकडून अपेक्षित प्रतिसाद नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालमत्ता वसुलीसाठी महापालिकेचा कर आकारणी व कर संकलन विभाग सक्रिय झाला आहे. २० ऑगस्टपर्यंत ४ लाख ५० हजार डिमांड वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. १६ ऑगस्टपर्यंत चार लाखाहून अधिक डिमांड वाटप करण्यात आलेल्या आहेत.
नागपूर शहरात सात लाख मालमत्ताधारक आहेत. काही मनपाच्या रेकॉर्डवर नाहीत. २०२०-२१ या वर्षात ५.६५ लाख मालमत्ताधारकांना डिमांड दिले जाणार आहे. झोन कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ३० जुलैपर्यंत ३ लाख ५२ हजार डिमांड वाटप करण्यात आले होते. २० ऑगस्टपर्यंत हा आकडा ४.५० लाखापर्यंत जाईल, अशी माहिती माहिती मालमता कर विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.
२०२०-२१ या वर्षात कर वसुलीचे उद्दिष्ट ३३२ कोटींचे असले तरी मालमत्ता कराची जुनी थकबाकी तब्बल ९०० कोटी आहे. पाच लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या १९९ मालमत्ता आहेत. या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काहींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. मोठ्या थकबाकीदारात केंद्र व राज्य सरकारच्या काही कार्यालयांचाही समावेश आहे. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. अशी प्रकरणे वगळता अन्य थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. परंतु मोठे थकबाकीदार पुढे येताना दिसत नाही. ३० जूनपर्यंत टॅक्स भरणाऱ्यांना १० टक्के सूट देण्यात आली. परंतु ४५,७९८ करदात्यांनीच याचा लाभ घेतला. आता पुन्हा ५ टक्के सूट देण्यात आली आहे.
....
झोननिहाय डिमांड वाटप
लक्ष्मीनगर ३८,७७१
धरमपेठ २९,१५५
हनुमाननगर ६०,४१५
धंतोली १९,५४७
नेहरूनगर ४८,०९९
गांधीबाग ३४,५११
सतरंजीपुरा ३२,८२०
लकडगंज ३७,१५३
आशीनगर ३४,३६६ं
मंगळवारी २६,८८५
....
काही झोन कार्यालयांचा खोडा
झोन कार्यालयांना २० ऑगस्टपर्यंत मालमत्ताधारकांना डिमांड वाटप करण्याचे निर्देश दिले होते. ३१ जुलैपर्यंत ३ लाख ५१ हजार डिमांड वाटप करण्यात आले. परंतु काही झोनकडून अपेक्षित प्रतिसाद नाही. याचा कर वसुलीला फटका बसत आहे.