योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकत्रित कुटुंबपद्धती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. मात्र मागील काही काळापासून मोठ्या शहरांमध्ये विभक्त कुटुंबपद्धतीच दिसून येत असून त्यामुळे कौटुंबिक समस्यादेखील निर्माण होत असल्याचे चित्र आहे. याच कौटुंबिक समस्या अनेकांच्या जीवावरदेखील उठत आहेत. २०१९ या एका वर्षात नागपुरात तब्बल साडेतीनशेहून अधिक लोकांनी केवळ घरातील समस्या व संघर्षांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांशी तुलना केली तर अर्ध्याहून अधिक जणांनी याच कारणामुळे जीव संपविला. ही बाब निश्चितच अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. एनसीआरबीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.२०१९ साली कौटुंबिक समस्यांमुळे नागपुरातील ३७१ जणांनी आत्महत्या केली. यात ३०२ पुरुष व ६९ महिला होत्या. दरम्यान, २०१९ या वर्षभरात नागपुरात विविध कारणांमुळे तब्बल ६३६ लोकांनी स्वत:चे आयुष्य संपविले. यात ५२५ पुरुष व ११ महिलांचा समावेश होता. वर्षभरातील आत्महत्यांचे विश्लेषण केले असता जवळपास ५८.३३ टक्के आत्महत्यांचे कारण हे कौटुंबिक समस्या हेच होते. २०१८ मध्ये शहरात ६८० आत्महत्यांची नोंद झाली.आजारपणात रुग्णांना मानसिक आधार हवासद्यस्थितीत सगळीकडेच कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. आजारपणात रुग्णांना मानसिक आधाराची फार आवश्यकता आहे हे एनसीआरबीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विविध आजारपणांमुळे शहरात वर्षभरात ११९ लोकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. यात कर्करोगाचे २७, पक्षाघाताचे १७, मानसिक नैराश्याचे ४४ तर दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या ३१ जणांचा समावेश होता. आजारपणात रुग्णांना समजून घेऊन त्यांना जास्तीत जास्त सकारात्मक बनविणे हे आव्हान असते व त्यासाठी योग्य संवाद साधला गेला पाहिजे, असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.नागपूर आठव्या स्थानीदेशभरातील आत्महत्यांकडे नजर टाकली असता नागपूर हे देशात आठव्या स्थानी आहे. तर राज्यात नागपूरचा समावेश तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईत १ हजार २२९, पुण्यात ७१९ आत्महत्यांची नोंद झाली.